लंडन, आसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज'चीच चर्चा होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कोणत्याही खेळाडूला राजकीय, धार्मिक किंवा जातीय संदेश देणारं कृत्य करण्याची मुभा नाही. तसा संदेश जाईल असेही काही करता कामा नये. त्याच नियमानुसार आयसीसीनं धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी धोनीला ते ग्लोव्हज न वापरण्याचे आदेश दिले, परंतु बीसीसीआयच्या मधस्तीनंतर आयसीसीनं नमतं घेतलं आहे. त्यांनी बीसीसीआयसमोर अट ठेवली आहे.
आयसीसीनं धोनीच्या ग्लोव्हजवर नोंदवलेला आक्षेप आणि दिलेल्या आदेशानंतर क्रिकेट चाहते चांगलेच खवळले. आयसीसीच्या या आदेशावर सोशल मीडियामधून जोरदार टीका सुरू आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. तसेच बीसीसीआय आणि काही माजी क्रिकेटपटूंनीही धोनीला समर्थन दिले आहे. या विवादाबाबत प्रतिक्रिया देताना बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राज यांनी सांगितले की, आम्ही आमच्या खेळाडूंसोबत उभे आहोत. धोनीच्या ग्लोव्ह्जवर जे चिन्ह आहे, ते कुठल्याही धर्माचे प्रतीक नाही. तसेच ते चिन्ह म्हणजे कुठलीही जाहिरात नाही, असेही राय यांनी स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयच्या या पवित्र्यानंतर आयसीसीनं एक पाऊल मागे घेतले आहे.''महेंद्रसिंग धोनी आणि बीसीसीआय यांनी ते बलिदान बॅज कोणतेही राजकीय, धार्मिक किंवा जातीय संदेश देणारा नाही, हे आयसीसीला पटवून द्यावे. त्यानंतर धोनीला परवानगी मिळेल,'' अशी माहिती आयसीसीच्या सूत्रांनी दिली आहे.