लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरची सेलिब्रेशन करण्याची स्टाइल ही सर्वांनाच आवडते. विकेट मिळवल्यावर ताहिर हा मैदानात धावत सुटतो आणि आपला आनंद व्यक्त करतो.
पाकिस्तानने दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर बाबर आझमने संघाचा धावफलक हलता ठेवला. आझमने ८० चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ६९ धावा केल्या. आझम आणि हारिस यांची भागीदारी यावेळी चांगलीच रंगली होती. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. पण यानंतर आझम बाद झाला. आझम बाद झाल्यावर हारिसने जोरदार हल्ले गोलंदाजीवर चढवले. हारिसने ५९ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
इम्रान ताहिरने या सामन्यात दोन विकेट्स मिळवत इतिहास रचला. आतापर्यंत विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डच्या नावावर होता. आतापर्यंत डोनाल्डने विश्वचषकात सर्वाधिक ३८ बळी मिळवले होते. पण या सामन्यात ताहिरने दोन बळी मिळवत विश्वचषकात एकूण ३९ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम आता ताहिरच्या नावावर झाला आहे.