लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने दोन बळी मिळवले. पण हे दोन बळी मिळवताना मात्र ताहिरने इतिहास रचला आहे. ताहिरने या सामन्यात पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने यावेळी ८१ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १६ धावांमध्ये हे दोन्ही सलामीवीर बाद झाले. या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले ते ताहिरने. पाकिस्तानचा सलामीवीर फझर झमानला ताहिरने पहिल्यांदा बाद केले. त्यानंतर ताहिरने इमाम उल हकचा काटा काढला. पण इमाम उल हकला बाद केल्यावर ताहिरने इतिहास रचला.
आतापर्यंत विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डच्या नावावर होता. आतापर्यंत डोनाल्डने विश्वचषकात सर्वाधिक ३८ बळी मिळवले होते. पण या सामन्यात ताहिरने दोन बळी मिळवत विश्वचषकात एकूण ३९ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम आता ताहिरच्या नावावर झाला आहे.