ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवून त्यांना हलक्यात लेखण्याची चूक करणाऱ्यांना इशारा दिला आहे. पण, भारताचा सामना करण्यासाठी ऑसी संघ तितक्याच ताकदीनं मैदानावर उतरण्यास सज्ज होत आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव केला. मात्र, ऑसींच्या डेव्हिड वॉर्नरने जोरदार फटकेबाजीवर भर दिला. भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी वॉर्नर आणखी एक 'सेंसर' स्ट्रॅटजी वापरणार आहे.
सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहचा सामना करण्यासाठी वॉर्नर सज्ज झाला आहे. त्यानं त्याच्या बॅटला विशेष प्रकारचं सेंसर लावून घेतलं आहे. ज्याच्यातून त्याला प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चेंडू वेग आणि आपल्या बॅटीच्या फटक्याचा वेग आदी गोष्टी माहित पडणार आहेत. 2017मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बॅट सेंसरला मान्यता दिली, परंतु त्याचा उपयोग तितकासा होताना दिसत नाही. बंगळुरूस्थीत कंपनीनं हा सेंसर शोध लावला. ही सेंसर चीप बॅटीवर लावून फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांबाबत बराच डाटा गोळा करू शकतो. ही चीप बॅटीच्या दांड्यावर लावली जाते. फलंदाज मैदानावर खेळत असताना चीपशी जोडलेल्या मोबाईल अॅपवर डाटा गोळा होत असतो.
वॉर्नरने गोळा केलेल्या डाटानुसार कसून सराव केला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास.. बुमराहच्या यॉर्करचा सामना करण्यासाठी फलंदाजाला 70-75 किलोमीटरच्या वेगाने बॅटीनं फटका मारावा लागतो. पण, वॉर्नरने 85 ते 90 km वेगानं फटका मारण्याचा सराव केला आहे.