ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. ऑस्ट्रेलिया : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून सर्वाधिक षटकार खेचण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने महेंद्रसिंग धोनीचा 354 धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 520 षटकारांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शाहिद आफ्रिदी ( 476) आणि ब्रेंडन मॅकलम ( 398) यांचा क्रमांक येतो. सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याच्या विक्रमात गब्बर-हिटमॅन जोडीनं पाचवे स्थान पटकावलं. त्यांची ही 16वी शतकी भागीदारी आहे. या विक्रमात सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही जोडी 26 शतकी भागीदारीसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दिलशान व कुमार संगकारा ( 20), अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन ( 16), विराट कोहली व रोहित ( 16) यांचा क्रमांक येतो.
त्यानंतर धवनने कर्णधार कोहलीसह 93 धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. रोहितनं 70 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 57 धावा केल्या. धवनची 117 धावांची खेळी मिचेल स्टार्कने संपुष्टात आणली. धवनने 109 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीनं ही खेळी साकारली. आयसीसीच्या स्पर्धेत एकाच मैदानावर तीन शतकं झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. धवनचे ओव्हल मैदानावरील तिसरे शतक आहे. 2019मधील त्याचे हे पहिलेच, तर क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चौथ्यांदा शतकी खेळी केली आहे. अजय जडेजा ( 1999) याच्यानंतर ओव्हलवर वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
धवन माघारी परतल्यानंतर कोहली व हार्दिक पांड्या जोडीनं अखेरच्या दहा षटकांत तुफान फटकेबाजी केली. दरम्यान कोहलीनं 50 धावा केल्या, त्यानं अर्धशतकाचे अर्धशतक पूर्ण केले. पांड्यानंही आतषबाजी करताना 27 चेंडूंत 48 धावा चोपल्या. पॅट कमिन्सने त्याला कर्णधार अॅरोन फिंचकरवी झेलबाद केले. कोहली व पांड्यानं 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीनंही हात धुऊन घेतले. त्यानं 14 चेंडूंत 27 धावा केल्या. कोहलीची फटकेबाजी 82 धावांवर स्टॉइनिसने रोखली. वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली आजची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी 2015 मध्ये सिडनीत श्रीलंकेने 312 धावा केल्या होत्या. भारताने तो विक्रम आज मोडला.
गब्बरचे हे शतक खास, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
बँकांचे कर्ज बुडवणारा विजय माल्ल्या लुटतोय सामन्याचा आनंद!
मिट्टी की खुशबू; भारतीय संघाला भेट म्हणून दिली 'माती', जाणून घ्या कारण!
हिटमॅन रोहितनं मोडला तेंडुलकर, रिचर्ड यांचा विक्रम
आज जो जिंकेल, तो वर्ल्ड कप घेऊन जाईल, कसं ते तुम्हीच वाचा!
भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरची 'सेंसर' स्ट्रॅटजी!