ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. ऑस्ट्रेलिया : गब्बर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत शतक ठोकून भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. धवनने 95 चेंडूंत शतक पूर्ण केले. रोहित शर्मासह शतकी भागीदारी केल्यानंतर धवनने कर्णधार विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठीही अर्धशतकी भागीदारी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
आयसीसीच्या स्पर्धेत एकाच मैदानावर तीन शतकं झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. धवनचे ओव्हल मैदानावरील तिसरे शतक आहे. 2019मधील त्याचे हे पहिलेच, तर क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चौथ्यांदा शतकी खेळी केली आहे. अजय जडेजा ( 1999) याच्यानंतर ओव्हलवर वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
गब्बर-हिटमॅन ही जोडी आहे कमाल, वाचा काय केली धमाल!रोहितला मिळालेलं जीवदान, धवनला झालेली दुखापत यानंतर दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ करताना ऑसी गोलंदाजांना हैराण केले. या दोघांनी वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक यशस्वी जोडीचा मान पटकावला. त्यांनी शतकी भागीदारी करताना गॉर्डन ग्रिनीज आमि डेस्मंड हायनेस यांचा 1152 धावांचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात यशस्वी भारतीय जोडीचा मानही त्यांनी पटकावला. सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर या जोडीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 827 धावा करता आल्या आहेत.
रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून सर्वाधिक षटकार खेचण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने महेंद्रसिंग धोनीचा 354 धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 520 षटकारांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शाहिद आफ्रिदी ( 476) आणि ब्रेंडन मॅकलम ( 398) यांचा क्रमांक येतो.
सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याच्या विक्रमात गब्बर-हिटमॅन जोडीनं पाचवे स्थान पटकावलं. त्यांची ही 16वी शतकी भागीदारी आहे. या विक्रमात सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही जोडी 26 शतकी भागीदारीसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दिलशान व कुमार संगकारा ( 20), अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन ( 16), विराट कोहली व रोहित ( 16) यांचा क्रमांक येतो.