ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जीवदान मिळाल्यानंतर रोहित शर्मानं संयमी खेळ करत शिखर धवनसह भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना करताना अर्धशतकी भागीदारी नोंदवली. या सामन्यात धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9000 धावांचा पल्ला ओलांडला, तर रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रम नावावर केला. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला शुभेच्छा म्हणून एक भेट देण्यात आली... ती भेट म्हणजे लाल मातीनं भरलेला एक बॉक्स होती. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हा काचेचा बॉक्स भेट दिला. ही माती देण्यामागचं नेमकं कारण काय?
वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या शहरातून ही माती आणण्यात आली होती. जेथे या खेळाडूंनी क्रिकेटचा श्रीगणेशः केला तेथून म्हणजेच प्रत्येक खेळाडूंच्या शाळेतून ही माती एकत्र करून कर्णधार कोहलीला भेट देण्यात आली. कोहलीनंही या गिफ्टचा आनंदाने स्वीकार करत त्या मातीच्या सुगंध घेतला.
हिटमॅन रोहितनं मोडला तेंडुलकर, रिचर्ड यांचा विक्रम हिटमॅन रोहित शर्माने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि व्हीव्ह रिचर्ड यांचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वीसावी धाव घेताच रोहितनं हा विक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगाने दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला. आतापर्यंत व्हीव रिचर्ड्स यांनी 45 डावांत, सचिन तेंडुलकरने 51 डावांत आणि डेसमंड हेन्स यांनी 59 डावांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावल्या आहेत. मात्र रोहितने आतापर्यंत केवळ 37 डावांमध्येच 61.87 च्या जबरदस्त सरासरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980 धावा फटकावल्या होत्या आणि त्यानं आजच्या सामन्यात 20 धावा करून 2000 धावांचा पल्ला पार केला. रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात शतकं आणि सात अर्धशतकं झळकावली आहेत. आज तो किती धावा करतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आज जो जिंकेल, तो वर्ल्ड कप घेऊन जाईल, कसं ते तुम्हीच वाचा!या दोन्ही संघांमध्ये झालेल्या चार महत्त्वाच्या लढतींचा विचार केल्यास आजचा सामना जो संघ जिंकेल, त्याचे वर्ल्ड कप विजयाचे आशा अधिक होतील. 1999, 2003 आणि 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या लढतीत कांगारूंनी बाजी मारली होती आणि नंतर त्या सालचा वर्ल्ड कपही ऑस्ट्रेलियाने उंचावला होता. 2011मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले होते आणि तेव्हाचा वर्ल्ड कप नावावर केला होता. आता या आकडेवारीचा विचार केल्यास आजचा सामना जिंकणाऱ्या संघाच्या वर्ल्ड कप विजयाच्या आशा वाढणार आहेत. मग, या आकडेवारीनुसार बाजी कोण मारणार? दोन्ही संघांत आतापर्यंत 136 वन डे सामने झाले होते आणि त्यात ऑसींनी 77,तर भारताने 49 सामने जिंकले आहेत. पण, भारतीय संघाचे पारडे सध्यातरी जड आहे.