ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसं उपटली असली तरी त्याच्यातील खेळाडूनं आज साऱ्यांची मनं जिंकली. एक सच्चा खेळाडू दुसऱ्या खेळाडूचा आदर करू शकतो, हे त्यानं कृतीतून दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथला डिवचणाऱ्या भारतीय चाहत्यांचे कोहलीनं कान टोचले. चेंडू कुरतडण्याप्रकणात शिक्षा पूर्ण करून राष्ट्रीय संघात कमबॅक करणाऱ्या स्मिथ व डेव्हिड वॉर्नरला वर्ल्ड कप स्पर्धेत चाहते जाणीवपूर्वक डिवचत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही हे पाहायला मिळाले. पण, कोहलीनं चाहत्यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. कोहलीच्या या कृतीनं स्मिथही भारावला आणि त्यानं कोहलीशी हस्तांदोलन केले.
शिखर धनवची दुखापत गंभीर, म्हणून आला नाही फिल्डींगला?
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या शिखर धवनला दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याच्या अंगठ्याला ही दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला वैद्यकिय मदत घ्यावी लागली. पण, तरीही तो मैदानावर टिकून राहिला आणि त्याने 117 धावांची खेळी करताना भारतीय संघाला 352 धावांपर्यंत मजल मारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. पण, धवन त्यानंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. त्याच्याजागी रवींद्र जडेजा मैदानावर दिसला. त्यामुळे धवनची दुखापत गंभीर असल्याची चर्चा रंगली आहे.
तत्पूर्वी, नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
Web Title: ICC World Cup 2019, IND vs AUS : Virat Kohli bat for Steve Smith, brilliant gesture from Team India captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.