ओव्हल, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली. रोहित शर्माला मिळीलेलं जीवदान ही भारतीय चाहत्यांसाठी आतापर्यंतची मोठी बातमी आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर रोहित व शिखर धवन यांनी केलेली सावध सुरुवात, यामुळे सामन्याचा आताच अंदाज बांधणे अवघड आहे. पण, आजच्या सामन्यात जो जिंकेल, तो वर्ल्ड कप नक्की घेऊन जाईल; तसं वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास सांगतो. चला तर मग जाणून घेऊया, काय आहे गणित?
ऑस्ट्रेलियाची कामगिरी कितीही निराशाजनक झालेली असली तरी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये त्यांनी नेहमीच आपला दबदबा दाखवला आहे. म्हणूनच त्यांच्या नावावर पाच वर्ल्ड कप जेतेपदं आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवून त्यांना हलक्यात लेखण्याची चूक करणाऱ्यांना इशारा दिला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचा निकाल पाहता 11पैकी 8 सामने कांगारुंनी जिंकले आहेत. भारताला केवळ तीनवेळा ऑसींना पराभूत करता आले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारताचे पारडे जड असले तरी ऑसी कोणत्याही क्षणी कमबॅक करू शकतो.
या दोन्ही संघांमध्ये झालेल्या चार महत्त्वाच्या लढतींचा विचार केल्यास आजचा सामना जो संघ जिंकेल, त्याचे वर्ल्ड कप विजयाचे आशा अधिक होतील. 1999, 2003 आणि 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या लढतीत कांगारूंनी बाजी मारली होती आणि नंतर त्या सालचा वर्ल्ड कपही ऑस्ट्रेलियाने उंचावला होता. 2011मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले होते आणि तेव्हाचा वर्ल्ड कप नावावर केला होता. आता या आकडेवारीचा विचार केल्यास आजचा सामना जिंकणाऱ्या संघाच्या वर्ल्ड कप विजयाच्या आशा वाढणार आहेत. मग, या आकडेवारीनुसार बाजी कोण मारणार? दोन्ही संघांत आतापर्यंत 136 वन डे सामने झाले होते आणि त्यात ऑसींनी 77,तर भारताने 49 सामने जिंकले आहेत. पण, भारतीय संघाचे पारडे सध्यातरी जड आहे.