ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. न्यूझीलंड : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारतानं दोन सामने जिंकून टॉप फोरमध्ये मुसंडी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर आज पाणी फिरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. सोमवारी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्यावरही पावसानं पाणी फिरवलं. याआधी 7 जूनला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम यंदा नोंदवला गेला आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघांना नेटमध्ये सराव करण्याची थोडीशी संधी मिळाली, परंतु बुधवारी बराच वेळ पावसामुळे वाया गेला. गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे सामना होण्याची शक्यताही फार कमीच आहे. येथील सध्याचं तापमान हे 10 ते 12 डिग्री सेल्सियस असे आहे. या महिन्यात नॉटींगहॅम येथे 98 मिमी पावसाची नोंद झाली आणि त्यापैकी 50 मिमी पाऊस हा मंगळवारी पडला.
म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव दिवस नाही, आयसीसीनं सांगितलं कारणपावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही विचारण्यात येत आहे. आयसीसीनंही राखीव दिवस न ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले की,''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असता तर स्पर्धा लांबली असती आणि व्यावहारिक रुपात हे परवडणारे नव्हते. त्याने खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना त्याचा फटका बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?''
बाद फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस''हा बेभरवशी पाऊस आहे. येथे जूनमध्ये होणाऱ्या पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. 2018 मध्ये येथे 2 मिमी पावसाची नोंद झाली होती, परंत आता केवळ 24 तासांत 100 मिमी पाऊस पडला आहे. बाद फेरीच्या सामन्यांसाठी आम्ही राखीव दिवस ठेवला आहे,'' अशी माहिती रिचर्डसन यांनी दिली.