ठळक मुद्देभारत ७ वेळा उपांत्य फेरीत
आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्युझीलंडसोबत होणार आहे. न्युझीलंडने आतापर्यंत तब्बल ८ वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर भारताने सात वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र न्युझीलंडला उपांत्य फेरीचा अडथळा फक्त एकदाच म्हणजे २०१५ च्या विश्वचषकात पार करता आला आहे. तर भारताने आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यातील दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. या दोन्ही संघांचा उपांत्य फेरीतील सामना मात्र पहिल्यांदाच होणार आहे.
१९७५ च्या विश्वचषकात भारताचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते. मात्र न्युझीलंडने उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी न्युझीलंडचा सामना वेस्टइंडिज्सोबत झाला आणि १९७५ च्या विश्वविजेत्या वेस्टइंडिजने न्युझीलंडला धुळ चारली होती. त्यानंतर न्युझीलंडने १९७९, १९९२, १९९९,२००७, २०११, २०१५ आणि आता २०१९ मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धांमधील दारुण पराभवानंतर भारताने १९८३ च्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली. त्यावेळी त्यांचा सामना इंग्लंडसोबत झाला. इंग्लंडला पराभूत करत भारताने अंतिम फेरी गाठली आणि वेस्ट इंडिजला पराभूत करत इतिहास रचला. मात्र १९८७ मध्ये मायदेशातच उपांत्य फेरी गाठणाºया भारताला इंग्लंडने वानखेडे स्टेडिअमवर ३५ धावांनी पराभूत केले.
भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे त्या संघाचे सदस्य होते. त्यानंतर भारताने १९९६, २००३, २०११, २०१५ आणि आता २०१९ मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. या पैकी २००३ आणि २०११ मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती आणि २०११ मध्ये वानखेडे स्टेडिअमवरच जेतेपद पटकावले होते.
भारत आणि न्यूझीलंड सामना रद्द झाला तर कोण जाणार अंतिम फेरीत, जाणून घ्या...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला होता. पण आता भारत आणि न्यूझीलंड यांची गाठ उपांत्य फेरीत पडणार आहे. पण हा सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, याची उत्सुकता तुम्हाला असेल.
यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होता. पण आता उपांत्य फेरीतील सामना जर पावसामुळे रद्द झाला तर काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 9 जुलैला खेळवण्यात येणार आहे. जर या दिवशी पाऊस पडला, तर त्यासाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण या दिवशीही पाऊस पडला तर काय होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आता ही गोष्ट सर्वात जास्त चिंतेत पाडणारी आहे.
पावसामुळे जर हा सामना रद्द करण्याची पाळी आली, तर दोन्ही संघांतील सामन्यात नेमके काय झाले हे पाहावे लागते. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे या सामन्याचा निकाल महत्वाचा ठरत नाही. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
Web Title: ICC World Cup 2019: India and New Zealand will play for the first time in the semi-finals of wc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.