मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अनेक माजी खेळाडूंनी भारतालाच पसंती दर्शवली आहे. पण, भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगचे याबाबतीत मत थोडसं वेगळ आहे. त्याच्या जेतेपदाच्या दावेदारांत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मागील वर्षभरातील भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांच्याच देशात नमवण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघचे फेव्हरेट आहे. अनेकांची पसंती भारतीय संघालाच आहे.
युवी म्हणाला," भारतीय संघ हा जेतेपदाच्या शर्यतीत आहे. पण, माझ्यासाठी इंग्लंड अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज हेही अनपेक्षित निकाल नोंदवू शकतात. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलिया संघ मजबूत झाला आहे. वेस्ट इंडीजचा काही नेम नाही. त्यांची कामगिरी कोणत्याक्षणी कशी होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे."
उपांत्य फेरीत कोणते संघ बाजी मारतील, या प्रश्नावर युवी म्हणाला," पहिले नाव इंग्लंडचे घेईन.. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे अंतिम चारमध्ये प्रवेश करतील. चौथा संघ कोणता असेल हे आता सांगणे अवघड आहे."