लंडन - आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाला धक्का बसला असून, मधल्या फळीतील फलंदाजांनी साफ निराशा केल्याने आजच्या लढतीसाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या एका अंतिम लढतीत शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला थरारक विजय मिळवून देणाऱ्या मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाजांला विराट कोहली अंतिम संघात स्थान देणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तो फलंदाज म्हणजे दिनेश कार्तिक.यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत समाधानकारक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघासाठी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरचे फलंदाज ही डोकेदुखी ठरले आहेत. त्यामुळे संघाची मधली फळी कमकुवत बनली आहे. अशा परिस्थितीत मधल्या फळीत संघाला स्थैर्य देतानाच वेगाने धावा फटकावू शकेल अशा फलंदाजाचा शोध कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघव्यवस्थापनाकडून घेतला जात आहे. आता हा शोध दिनेश कार्तिकवर येऊन थांबण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये कोलकाता नाइटरायडर्सचे नेतृत्व करणाऱ्या दिनेश कार्तिकने मधल्या फळीत अनेकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतींचे उदाहरण द्यायचे झाल्यास गतवर्षी 18 मार्च 2018 रोजी झालेली निदहास करंडक स्पर्धेतील अंतिम लढत कुणी विसरणार नाही. त्या लढतीत बांगलादेशचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना दिनेश कार्तिक मैदानात उतरला. त्यानंतर त्याने अवघ्या आठ चेंडूत 29 धावा कुटल्या होत्या. अखेरीस सामन्यातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत कार्तिकने भारताला चार विकेट्सनी विजय आणि निदहास करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते. कार्तिकची ही कामगिरी विचारात घेऊन आजच्या लढतींत कर्णधार विराट कोहली त्याला संधी देतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.