लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात होत असून, या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. या विश्वचषक स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असल्याने स्पर्धा अधिकच आव्हानात्मक बनली आहे. तसेच विजेतेपद मिळवण्यासाठी पहिल्या चेंडूपासून झुंज द्यावी लागणार आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केले होते.
महेंद्रसिंग धोनीनं कुठल्या क्रमांकावर खेळावं? सचिन तेंडुलकरनं दिलं उत्तरभारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यात भारतीय संघ अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ जाहीर झाल्यापासून किंवा तत्पूर्वी पासून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची चर्चा सुरू होती. अनेकांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला या क्रमांकावर खेळवावे असा प्रस्ताव मांडला, परंतु माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने धोनीनं कोणत्या क्रमांकावर खेळावे हा सल्ला दिला आहे.
धोनीबाबत तेंडुलकर म्हणाला,''मला विचाराल तर धोनीनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. फलंदाजीची क्रमवारी कशी असेल याबाबत मला माहीत नाही. रोहित आणि शिखर धवन सलामीला येणार असतील, तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल हे माहीत नाही, परंतु धोनी पाचव्या क्रमांकावर येईल. त्यानंतर हार्दिक पांड्या असेल. धोनीसारखा अनुभवी फलंदाज अखेरपर्यंत संघाचा धावफलक हलता ठेवेल आणि तो खेळपट्टीवर असताना पांड्या आक्रमक खेळी खेळेल.''