मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : : विराट कोहलीचा भारतीय संघ आक्रमक आहे, असे म्हटले जाते. आजच्या क्रिकेटमध्ये ही आक्रमकता गरजेचीही आहे, असं जाणकार सांगतात. पण, हा आपला संघ आक्रमतेच्या पुढची पायरी गाठून अहंकारी, बेमुर्वतखोर किंवा मुजोरीकडे तर झुकत नाहीए ना, अशी शंका इंग्लंडमधील एका घटनेतून येते. विश्वचषकाच्या एका पत्रकार परिषदेसाठी भारतीय संघाने आपल्या टीममध्ये नसलेल्या तीन खेळाडूंना पाठवले आणि पत्रकार खवळले. हे स्वाभाविक होतेच. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या पत्रकार परिषदेमध्ये पंधरा सदस्यीय संघातील खेळाडूंना का पाठवले नाही, हा सरळ साधा प्रश्न पत्रकारांचा होता. कारण संघाबद्दल जर या खेळाडूंना विचारले असते तर त्यांनी उत्तर दिलेच असते, असे नाही. आणि संघात नसलेल्या खेळाडूंना टीमबद्दल बोलायचा अधिकार आहे का, हा मुळात प्रश्न आहे. खलील अहमद, अवेश खान आणि दीपक चहर हे भारतीय संघात नाहीत. त्यांना पत्रकार काय प्रश्न विचारणार आणि ते काय उत्तरं देणार, हा कळीचा मुद्दा आहे. जर भारतीय संघाला काही गोष्टी गुप्त ठेवायच्या होत्या, तर त्या प्रश्नांना ' नो कमेंट्स' असे साधे उत्तर देता आले असते. पण हा साधा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाला करता आला नाही.
भारतीय संघात विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची दादागिरी चालते, असे म्हटले जाते. पण जसे तुम्ही संघात वागता तसेच तुम्ही प्रसारमाध्यमांशी किंवा सार्वजनिक आयुष्यात वागू शकत नाही. आक्रमकपणा आणि अहंकार यामध्ये एक पुसट रेषा असते. ती रेषा नेमकी कुठे आहे, हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते.
विश्वचषकापूर्वी केदार जाधव, विजय शंकर, विराट कोहली, रोहित शर्मा हे दुखापतग्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर जसप्रीत बुमराची उत्तेजक चाचणी झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी चांगलीच इंग्लंडची सफारी केली आहे. भारताचा पहिला सामना हा दक्षिण आफ्रिकेशी आहे, या साऱ्या गोष्टींच्या निगडीत प्रश्न विचारले जाऊ शकले असते. या प्रश्नांना सामोरे जाणे हे कठीण नक्कीच नव्हते. महेंद्रसिंग धोनी जेव्हा कर्णधार होता, तेव्हा तो या साऱ्या पत्रकार परिषदेला यायचा आणि प्रश्नांची उत्तरे द्यायचा. पण या भारतीय संघाला पत्रकार परिषद हा पोरखेळ वाटत असेल, तर त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच असेल. पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून भारतीय संघाला इंगा दाखवलाच आहे. आमच्यासाठीच हा मीडिया आहे आणि आम्ही त्यांना कसेही वागवू शकतो, असे जर भारतीय संघाला वाटत असेल तर त्यांची ही घोडचूक ठरेल. हे कृत्य करून भारतीय संघाने आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे, हे निश्चित.
आम्ही तुम्हाला खिजगिणतीत धरतच नाही, अशी वागणूक भारतीय संघ व्यवस्थापनाने पत्रकारांना दिली आहे. हा पत्रकारांचा अपमानच आहे. पण गोष्टीपासून भारतीय संघ वाचू शकला असता. जर भारतीय संघ खरेच व्यस्त होता किंवा त्यांना पत्रकारांसमोर काही गोष्ट आणायच्या नव्हत्या तर त्यांना ही परिषद रद्द करता आली असती. पण तसे त्यांनी केले नाही. ह्याला मुजोरी नाही तर काय म्हणायचं? हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला आहे.