लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या दमदार पुनरागमनाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे समजले जात होते. मात्र, त्यांनी दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांच्यावर विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. बुधवारी झालेल्या लढतीत त्यांनी 6 विकेट राखून विजय मिळवून किवांचा विजयरथ अडवला. आता त्यांना उर्वरित दोन सामन्यांत बांगलादेश व अफगाणिस्तान यांचा सामना करावा लागणार आहे. न्यूझीलंडवरील विजयानंतर पाकिस्तान संघांवर कौतुकाचा वर्षाव झाला. आजी-माजी खेळाडूंनी पाक संघाच्या लढाऊ वृत्तीची प्रशंसा केली. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानेही पाक संघाच्या कामगिरीवर ट्विट केले आहे.
सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे सर्वाधिक चार सामने शिल्लक आहेत आणि ते 9 गुणांसह तिसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. त्यानंतर सानिया मिर्झानं ट्विट केले.
भारत-पाक सामन्यावरील जाहिरातींवर सानिया मिर्झाचा 'घरचा अहेर'!वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्या महामुकाबल्या दरम्यान उत्पादक कंपन्यांमध्ये जाहीर वॉर रंगले होते. त्या जाहिराती करताना अनेकदा पातळी घसरलेली पाहायला मिळाली आहे. स्टार स्पोर्ट्स वाहीनीनं केलेली 'अब्बू' हा जाहिरात आणि त्याला पाकिस्तानकडून मिळालेल प्रत्युत्तर. त्यामुळे सोशल साईटवर वॉर सुरू झाला आहे. त्यावर सानिया मिर्झानं दोन्ही देशांतील चाहत्यांना घरचा अहेर दिला आहे.