ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला भारताचे आव्हान

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीची नजर रविवारी खेळल्या जाणा-या विश्वकप लढतीदरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीचा बळी घेण्यावर केंद्रित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 06:53 AM2019-06-30T06:53:24+5:302019-06-30T06:54:00+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: India's challenge to host England | ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला भारताचे आव्हान

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला भारताचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्मिंगहॅम : भारतीय संघ रविवारी खेळल्या जाणाऱ्या विश्वकप स्पर्धेतील हाय-प्रोफाईल लढतीत अडचणींच्या गर्तेत सापडलेल्या यजमान इंग्लंडविरुद्ध शानदार विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्यास उत्सुक आहे.
आतापर्यंत सहा सामन्यांत भारतीय संघाला अद्याप पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ ११ गुणांसह उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करीत आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या विजयाने भारतीय संघ गुणतालिकेतील अव्वल स्थान मजबूत करेल. जर या लढतीत भारतीय संघाने विजय मिळवला, तर यजमान संघाला गाशा गुंडाळावा लागेल.

इंग्लंडची अशी स्थिती का झाली?
स्पर्धेपूर्वी इंग्लंड संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, पण इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील हा संघ मोक्याच्या क्षणी ढेपाळला आणि आता सात सामन्यांत त्यांच्या खात्यावर केवळ ६ गुणांची नोंद आहे. आता हा संघ स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत आहे. कर्णधार मॉर्गन, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीनंतरही अलीकडच्या वर्षांतील सर्वोत्तम वन-डे संघाला अशा प्रकारे गाशा गुंडाळावा लागणे निराशाजनक आहे.

बेयरस्टोचे वक्तव्य चर्चेत
रविवारी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनमध्ये भारतीय चाहत्यांच्या उपस्थितीत दडपणाखाली असलेल्या संघाला अधिक अडचणींना सामोरे जावे लागेल. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन व केव्हिन पीटरसन यांच्यावर जॉनी बेयरस्टोच्या वक्तव्यामुळे अधिक दडपण आले. बेयरस्टोने पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, ‘लोक आमच्या अपयशाची प्रतीक्षा करीत होते. ते अनेकदा आमच्या विजयामुळे खूश नव्हते. आम्ही पराभूत व्हावे आणि त्यांना आमच्यावर टीका करता यावी, याची ते प्रतीक्षा करीत होते. इंग्लंडमध्ये ही सर्वसाधारण स्थिती असून प्रत्येक खेळात अशीच परिस्थिती आहे.’

परिस्थिती भारताला अनुकूल
भारतासाठी इंग्लंडला पराभूत करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण यजमान संघ दडपणाखाली आहे. सामन्यादरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार असून खेळपट्टी कोरडी असल्यामुळे फिरकीला अनुकूल राहील. अशा स्थितीत दोन मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाºया फिरकीपटूंसह जसप्रीत बुमराहचा मारा इंग्लंडला अडचणीत आणू शकतो. इंग्लंडमध्ये यापूर्वी भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत यजमान संघाने २-१ ने बाजी मारली होती, ही इंग्लंड संघासाठी दिलासा देणारी बाब आहे, पण बुमराह त्यावेळी दुखापतग्रस्त होता आणि तो त्या मालिकेत खेळला
नव्हता.

मोईनची नजर कोहलीच्या विकेटवर
इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीची नजर रविवारी खेळल्या जाणा-या विश्वकप लढतीदरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीचा बळी घेण्यावर केंद्रित आहे. कोहलीने गेल्या दोन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली आहेत. अली आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. तो म्हणाला, ‘विराट भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे. त्याच्यासारख्या खेळाडूला बाद करणे महत्त्वाचे ठरते. त्याला बाद केल्यानंतरही आमच्यातील मैत्री कमी होणार नाही.’

हेड-टू-हेड
या दोन्ही संघांदरम्यान सन १९७४ पासून आतापर्यंत ९९ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी भारताने ५३ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. इंग्लंडने ४१ सामने जिंकले आहेत. याशिवाय दोन सामने टाय झाले असून, तीन सामने कोणत्याही निकालाविना संपले.
या दोन्ही संघांदरम्यान शेवटच्या पाच लढतींमधील तीन सामने इंग्लंडने, तर दोन सामने भारताने जिंकले आहेत.
या दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये १९७५ पासून आतापर्यंत सात सामने झाले असून, यातील प्रत्येकी तीन सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंडने विजय मिळविलेला आहे. एक सामना टाय झाला आहे.
विश्वचषकामध्ये या दोन्ही संघांनी परस्परांच्या विरोधात ३३८ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.
भारताची इंग्लंडच्या विरोधात १३२ धावांची नीचांकी खेळी आहे, तर इंग्लंडची नीचांकी धावसंख्या १६८ आहे.

Web Title: ICC World Cup 2019: India's challenge to host England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.