मुंबई : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप २०१९ स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. पण या संघात कमतरता असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वविजयात मोलाचे योगदान देणाऱ्या गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.
भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू आणि तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण या संघात कमतरता असल्याचे गंभीरला वाटते. याबाबत गंभीर म्हणाला की, " जूनमध्ये होणारा विश्वचषकाचा कालावधी जास्त आहे. जेव्हा कालावधी जास्त असतो तेव्हा तुमच्याकडे जास्त पर्याय असणे महत्वाचे असते. भारताच्या विश्वचषकाच्या संघात तीन वेगवान गोलंदाज निवडण्यात आले आहेत. त्यामुळे या संघात कमतरता आहे ती चौथ्या वेगवान गोलंदाजांची. जर या संघात चौथा वेगवान गोलंदाज असला असता तर ही टीम संतुलित असली असली असती. "
पंधरा सदस्यीय भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
भारताचे सामने ( वेळ दुपारी 3 वाजता) बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिकारविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलियागुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंडरविवार 16 जून 2019 : पाकिस्तानशनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तानगुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिजरविवार 30 जून 2019: इंग्लंड मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका
वर्ल्ड कपच्या या संघात रिषभ पंत आणि अंबाती रायुडू नसल्याने बऱ्याच जणांनी निवड समितीवर टीका केली. पण आता पंत आणि रायुडू यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताच्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत. भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. 2007 मध्ये भारताने ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सात खेळाडू 2019च्या स्पर्धेतही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.
भारताच्या पंधरा सदस्यीत संभाव्य संघात पंत आणि रायुडू यांचे नाव नाही, पण तरीही त्यांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते. कारण निवड समितीने काही राखीव खेळाडू विश्वचषकासाठी ठेवले आहेत. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर हे राखीव खेळाडू भारतीय संघातून खेळू शकतील. या राखीव खेळाडूंमध्ये पंत आणि रायुडू यांचा समावेश करण्यात आला आहे.