Join us  

ICC World Cup 2019 INDvSA : पाच संघांचे दोन सामने झाले, मग भारतीय संघाचा सामना इतका उशिरा का?

ICC World Cup 2019 IND_SA: वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास एक आठवडा झाल्यानंतर स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना आज होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 9:14 AM

Open in App

साउदॅम्प्टन, आयसीसीवर्ल्ड कप 2019भारत वि. दक्षिण आफ्रिका : वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास एक आठवडा झाल्यानंतर स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना आज होणार आहे. भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो आला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आणि त्या मोहिमेला आजपासून दक्षिण विरुद्धच्या सामन्यापासून सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेची स्पर्धेतील कामगिरी आणि त्यांच्या मागे लागलेले दुखापतीचं ग्रहण पाहता आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. 

इंग्लंड आणि बांगलादेश संघांनी आफ्रिकेला नमवून स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. डेल स्टेननं तंदुरुस्तीच्या कारणास्तव स्पर्धेतूनच माघार घेतल्याने आफ्रिकेची डोकेदुखी वाढली आहे. त्यात दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज लुंगी एमगिडी या सामन्यात खेळणार नाही. दुसरीकडे भारतीय संघ मजबूत दिसत आहे. सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला. दहा संघापैकी पाच संघांचे आतापर्यंत प्रत्येकी दोन, तर उर्वरीत चार संघाचे प्रत्येकी एक सामना झाला आहे. पण, भारत आज पहिला सामना खेळणार आहे, असं का? स्पर्धा सुरू होऊन 6 दिवस झाले आणि भारतीय संघाचा एकही सामना न झाल्याने आश्चर्य वाटणं साहजिक आहे. पण, आम्ही यामागचं कारण शोधलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वेळापत्रकानुसार भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत 2 जूनला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार होता. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आयसीसीला वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार दोन स्पर्धांमध्ये 15 दिवसांचा विश्रांती वेळ असणे आवश्यक आहे. त्यानुसार इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा 12 मेला संपली आणि 27 तारखेला पंधरा दिवस पूर्ण होत होते. त्यामुळे भारताचा पहिला सामना 2 जूनला ठेवण्यात आला होता.

आयपीएलच्या आधीच्या वेळापत्रकानुसार अंतिम सामना हा 19 मे रोजी होणार होता. लोढा समितीच्या शिफारशीनुसार 3 जूनला 15 दिवसांचा विश्रांती कालावधी संपणार होता. त्यामुळे भारताचा पहिला सामना 5 जूनला नियोजित करण्यात आला. वेळापत्रकात बदल केल्याचा फायदा केदार जाधवलाही मिळाला. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेशी विश्रांती घेता आली. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविराट कोहलीद. आफ्रिकाभारतआयसीसी