साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला विश्वचषकाला मुकावे लागले. पण या स्टेनच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने व्यक्त केले आहे. विश्वचषकातील दोन सामन्यांच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का स्टेनच्या रुपात बसला. दक्षिण स्टेन हा अजूनही फिट न झाल्यामुळे त्याला विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटरवर खात्यावर दिली आहे. स्टेनच्या जागी ब्युरन हेंड्रीक्सला संघात स्थान देण्यात आले आहे.
स्टेनच्या दुखापतीबाबत फॅफ म्हणला की, " स्टेन जेव्हा आयपीएलमध्ये दोन सामने खेळला त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर स्टेनने आयपीएलच्या सामन्यांमध्ये रस दाखवला नाही. पण जर स्टेन हे दोन्ही सामने खेळला नसता तर कदाचित तो यंदा विश्वचषकात आमच्याबरोबर खेळत असला असता. स्टेनने फिट होण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण अखेर त्याला विश्वचषकात खेळता आले नाही." डेल स्टेनला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. स्टेन आरसीबीकडून आयपीएमध्ये खेळत होता. त्यावेळी 25 एप्रिलला स्टेन हा जायबंदी असल्याची बाब पुढे आली होती. स्टेनच्या उजव्या खांद्याला मार लागला होता. त्यानंतर स्टेनने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होती. पण आता दुखापतीमुळे स्टेनला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेला मुकावे लागण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत विश्वचषकातील दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या सामन्यात तर त्यांना बांगलादेशने पराभूत करत मोठा धक्का दिला होता. त्यामुळे आता जर स्टेन संघात नसेल तर त्यांचे काय होईल, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.दक्षिण आफ्रिका संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. नावाजलेले फलंदाज व गोलंदाज संघात असूनही आफ्रिकेला हार मानावी लागल्यानं क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आफ्रिकेचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे आणि यापूर्वी एकदाच त्यांना अशा नामुष्कीचा सामना करावा लागला होता. पराभवाचे सत्र सुरु असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडीला दुखापतीमुळे आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.