साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. दक्षिण आफ्रिका : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात कोहलीवर दडपण नक्की असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून विक्रमी कामगिरीची अपेक्षा असणे साहजिकच आहे. पण, या सामन्यात कोहलीच्या विश्व विक्रमाला आफ्रिकेच्या हाशिम अमलाकडून धोका आहे. अमलाची बॅट तळपल्यात कोहलीच्या नावावर असलेला विक्रम तो हिसकावून घेऊ शकतो.
अमलाला वन डे क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 77 धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो आफ्रिकेचा चौथा फलंदाज ठरू शकतो. याआधी जॅक कॅलिस ( 11550), एबी डिव्हिलियर्स ( 9427) आणि हर्शल गिब्स ( 8094) यांनी हा पल्ला गाठला आहे. या विक्रमासह अमलाला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात अमलाने 8000 धावांचा पल्ला पार केल्यास कोहलीच्या नावावरील विक्रम मोडू शकतो. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा विक्रम अमलाच्या नावावर नोंदवला जाईल.
कोहलीनं 175 डावांत हा पल्ला गाठला आहे, तर अमलाने 172 डावांत 7923 धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध 90 धावा केल्यास सर्वात जलद ( 173 डाव) 8000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. सध्याच्या घडीला या विक्रमात आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स ( 182 डाव), भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर हे अव्वल पाचात आहेत. अमलाच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000, 4000, 5000, 6000 आणि 7000 धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने 175
वन डे सामन्यांत 49.74च्या सरासरीनं 7923 धावा केल्या आहेत. त्यात 27 शतकं व 37 अर्धशतकांचा समावेश आहे. या सामन्यात यष्टिरक्षक क्विंटन डी'कॉकलाही वन डे क्रिकेटमध्ये 8000 धाव पूर्ण करण्यासाठी 22 धावांची गरज आहे.