साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता भारतीय संघ हा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे आणि पहिल्या सामन्यात त्यांची कामगिरी कशी होती याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. पण, आजच्या सामन्यात अंतिम अकरा शिलेदार कोण असतील, हा प्रश्न सध्याच्या घडीला सतावत आहेत. याचे उत्तर कर्णधार विराट कोहलीने दिले.
खेळपट्टीचा अंदाज बांधता आफ्रिकेविरुद्ध भारत एक अतिरिक्त जलदगती गोलंदाजासह मैदानात उतरेल, असे संकेत कोहलीनं दिले. तो म्हणाला,''मळभ असताना इंग्लंडंधील वातावरण वेगळे असते आणि लख्ख सुर्यप्रकाशातही वेगळी असते. नव्या चेंडूंने गोलंदाजी करताना संघात एक अतिरिक्त जलदगती गोलंदाज खेळवणे फायद्याचे ठरू शकते.'' अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या मदतीला भुवनेश्वर कुमार आज अंतिम अकरामध्ये दिसू शकतो.
भुवनेश्वर फलंदाजीतही उपयुक्त ठरू शकतो. अशात केदार जाधवचे खेळणे निश्चित झाले,तर भारतीय संघ एकाच फिरकीपटूसह मैदानावर उतरू शकतो. कोहली म्हणाला,''सकाळी 10.30 वाजता फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल. यासंदर्भात आम्ही चर्चा केली. गोलंदाजांच्या दृष्टीनं विचार केल्यास दोन फिरकीटू व दोन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरल्यास सुरुवातीला परिस्थिती वेगळी आणि नंतर वेगळी असेल. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोलंदाजांनी तयारी करायला हवी."
''केदार जाधवने नेटमध्ये कसून सराव केला आणि त्याने जोरदार फटकेबाजीही केली. त्यामुळे त्याचे संघात असणे फायद्याचे ठरेल. खेळपट्टी पाहिल्यानंतर अंतिम संघ काय असेल याचा निर्णय घेतला जाईल. सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,''असा विश्वास कोहलीनं व्यक्त केला.
'या' स्टेडियमवर भारत खेळणार पहिला सामना, यापूर्वी कशी झालीय कामगिरी?
साउदम्टन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेचे पाच सामने खेळवण्यात येणार आहेत आणि ज्यात भारताच्या दोन सामन्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेसह भारतीय संघ 22 जूनला अफगाणिस्तानचा याच मैदानावर सामना करणार आहे. 2001 साली हे स्टेडियम तयार करण्यात आले. कौंटी क्रिकेटमधील हॅम्पशायर क्लबचे हे घरचे मैदान आहे आणि त्याची क्षमता 15000 प्रेक्षकांची आहे. या मैदानावर प्रथमच वर्ल्ड कप सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर भारतीय संघ तीन वन डे सामना खेळला आहे आणि त्यात त्यांना एकच विजय मिळवता आलेला आहे. 11सप्टेंबर 2004 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत केनियावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 आणि 2011मध्ये झालेल्या सामन्यांत त्यांना इंग्लंडकडून हार पत्करावी लागली आहे.
Web Title: ICC World Cup 2019 INDVSA: Who will be in final XI for Team India, Virat kohli give hint?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.