लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आयपीएलमध्ये बऱ्याच खेळाडूंना दुखापत झाली. भारताचा केदार जाधवही आयपीएलमध्ये जायबंदी झाला होता. आता तो फिट असल्याचे म्हटले जात असले तरी तो पहिला सामना खेळणार का, याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला मात्र विश्वचषकाला मुकावे लागले आहे. पण तरीही आयपीएलचा विश्वचषकावर कोणताही परीणाम होणार नाही, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी केदार जाधवच्या सहभागावर बरीच चर्चा रंगली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे जाधव वर्ल्ड कप स्पर्धेतूनही माघार घेईल, असे चित्र होते. पण, जाधवने कसून मेहनत घेतली आणि स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करून संघासोबत इंग्लंड गाठले. संघाच्या सराव सत्रातही त्याने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
कोहली म्हणाला की, " आयपीएलचा कोणताही परीणाम विश्वचषकाच्या कामगिरीवर होणार नाही. आयपीएलमध्ये भारताचे सारे खेळाडू वेगवेगळ्या संघात होते. पण आयपीएलच्या वेळी ते जेव्हा एकमेकांना भेटत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये कुठलीही कटुता नव्हता. उलटपक्षी त्यावेळी खेळाडू, आपण भारताच्या सामन्यांसाठी एकत्र यायला पाहिजे, असे म्हणत होते. त्यामुळे आयपीएलच्या कोणत्याही गोष्टीचा विश्वचषकावर परीणाम होणार नाही."
दक्षिण आफ्रिकेला कमी लेखण्याची चूक करणार नाहीआमच्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. पण तरीही त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. कारण प्रत्येक संघात चांगले खेळाडू आहेत. प्रत्येक संघ हा तुल्यबळ आहे. त्यामुळे विश्वचषकात कोणत्याही संघाविरुद्ध गाफिल राहून चालणार नाही, असे कोहली म्हणाला.
डेल स्टेन लवकर फिट व्हावाडेल स्टेनला दुखापतीमुळे विश्वचषकात खेळता येणार नाही, असे मी ऐकले आहे. पण तो एक चांगला गोलंदाज आहे. क्रिकेट विश्वात त्याने चांगले नाव कमावले आहे. त्यामुळे तो लवकर फिट व्हावा, अशीच आशी मी करेन.