ख्राईस्टचर्च : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघ जोमाने तयारीला लागले आहेत. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेसाठी अद्याप कोणत्याही देशाने अंतिम संघ जाहीर केलेला नाही. भारत आणि यजमान इंग्लंड हे दोन संघ वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण, 2015च्या वर्ल्ड कप उपविजेता न्यूझीलंड संघ डार्क हॉर्स ठरू शकतो. न्यूझीलंडची गेल्या वर्षभरातील कामगिरी ही उल्लेखनीय झालेली आहे आणि त्यांच्या संघ निवडीकडे अनेकांचे डोळे लागले आहेत. बुधवारी न्यूझीलंड वर्ल्ड कपसाठीचा संघ जाहीर करण्याची शक्यता आहे आणि या संघात भारतीय वंशाच्या इश सोधीला संधी मिळण्याची माहिती मिळत आहे.
न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार इश सोधी आणि यष्टिरक्षक टॉम ब्लंडल यांना इंग्लंड व वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या किवींच्या संघात संधी मिळू शकते. लेग स्पीनर सोधीने मागील काही मालिकांमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यामुळे टोड अॅश्टेलला त्यानं मागे टाकून वर्ल्ड कप संघासाठी दावेदारी मजबूत केली आहे. सोधीनं 30 वन डे सामन्यांत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यात त्यानं 5.53 च्या ईकोनॉमी रेटने 39 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने प्लंकेट शील्ड स्थानिक क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याशिवाय श्रीलंका आणि भारताविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे वर्ल्ड कप संघात मिचेल सँटनरसह तो फिरकी गोलंदाजीची मदार सांभाळणार आहे.
जलदगती गोलंदाजीची जबाबदाली ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांच्यावर असेल. हेन्री आणि फर्ग्युसन सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहेत. जिमी निशॅम व कॉलीन डी ग्रँडहोम अष्टपैलूच्या भूमिकेत असतील. फलंदाजी विभागात केन विलियम्सन, मार्टीन गुप्तील, रॉस टेलर, कॉलीन मुन्रो, लॅथम, हेन्री निलोल्स यांचा समावेश असेल. न्यूझीलंडच्या या फलंदाजांनी मागील वर्ष भरात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.