लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकनं शुक्रवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर 94 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्या मलिकला खेळण्याची संधी देण्यात आलेली नव्हती. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेला मलिक सध्या खराब कामगिरीशी झगडत आहे आणि त्यामुळेच त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला. अखेरच्या सामन्यात खेळायला न मिळाल्याची खंत करण्यापेक्षा पुढे चालत राहण्याचा निर्धार मलिकने बोलून दाखवला होता. मलिक आता केवळ ट्वेंटी-20 क्रिकेट खेळणार आहे. मलिकच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर टेनिस स्टार आणि पत्नी सानिया मिर्झाहे भावनिक ट्विट केलं.
ख्रिस गेल हा 90च्या दशकातील सक्रीय असलेला एकमेव खेळाडू आहे. मलिकनं 287 वन डे सामन्यांत 34.55च्या सरासरीनं 7534 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघातील सर्वाधिक धावा करणारा तो पाचवा खेळाडू आहे. शिवाय पाकिस्तानी फिरकीपटूंमध्येही सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो पाचवा आहे. पाकिस्तान संघात क्रमांक 1 ते 10 येथे त्याने फलंदाजी केली आहे.
मलिकच्या या निर्णयानंतर सानियानं ट्विट केलं की,''प्रत्येक कथेचा एक शेवट असतो, आयुष्यात प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात असते. देशासाठी 20 वर्ष खेळलास, हे तू अभिमानानं सांगू शकतोस. इझान आणि मलाही तुझा अभिमान वाटतो.