लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत भारताने चार विजय मिळवले आहेत आणि एक सामना पावसामुळे वाया गेला आहे. उपांत्य फेरीत भारताचा प्रवेश निश्चित मानला जात आहे, कारण उर्वरित चार सामन्यांत त्यांच्यासमोर इंग्लंड वगळल्यास अन्य संघांचे खडतर आव्हान नाही आहे. भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख पाहता जेतेपदाच्या शर्यतीत ते आघाडीवर असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ऑस्ट्रेलियाचा 2015च्या वर्ल्ड कप विजयी संघाचा कर्णधार मायकेल क्लार्कलाही तसे वाटते आहे. भारतीय संघातील एका खेळाडूकडे वर्ल्ड कपची चावी आहे, असे मत त्यानं व्यक्त केले आहे. मायकेल क्लार्क म्हणाला,''भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास त्याची चावी जसप्रीत बुमराहकडे असेल. बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल. बुमराहकडे कौशल्य आहे. तो तंदुरुस्त आहे.''
बुमराहला ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडून कडवे आव्हान मिळेल, असेही क्लार्क म्हणाला. वॉर्नरने सहा सामन्यांत 447 धावा केल्या आहेत. बुमराह हा यशस्वी गोलंदाज का आहे, यावर क्लार्क म्हणाला,''नव्या चेंडूवर बुमराह स्विंग व सीम दोन्ही करू शकतो. मधल्या षटकांत खेळपट्टी जेव्हा गोलंदाजांना सहकार्य करत नसते तेव्हा बुमराह आपल्या अतिरिक्त वेगाने प्रतिस्पर्धींना हैराण करतो. तो 150च्या वेगानं चेंडू टाकू शकतो. त्याचा यॉर्कर अप्रतिम आहे आणि तो रिव्हर्स स्विंगही सुरेख करतो. एका कर्णधाराला असाच गोलंदाज हवा असतो की गरजेच्या वेळी उपयोगी ठरेल.'' क्लार्कने विराट कोहलीच्या कर्णधारपदाचेही कौतुक केले.
इंग्लंड विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, आज पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑसीविरुद्ध लढतगेल्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ आपल्या चुकांपासून बोध घेत परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी साखळी फेरीत खेळणार आहे. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ अनुभवण्याची संधी मिळणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डस्वर खेळली जाणारी ही लढत विशेष होईल. पण गेल्या लढतती इंग्लंडला 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे या लढतीची रंगत आणखी वाढली आहे. हेडिंग्लेमध्ये विजयासाठी 233 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 212 धावांत संपुष्टात आला.