मुंबई : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेची जोरात तयारी केली आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर भारतीय खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत. यंदाचा वर्ल्ड कप हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघच उंचावेल, असा दावा केला जात आहे. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने मात्र वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचा दावेदार सांगणे अवघड असल्याचे सांगितले. पण, या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे चार हुकुमी खेळाडू कोण असतील आणि त्यातील X फॅक्टर कोण ठरेल याचे भाकित केले आहे.
तो म्हणाला," वर्ल्ड कप कोण जिंकेल हे सांगणे अवघड आहे. स्पर्धेचा फॉरमॅट बदलल्याने सर्व संघांना समान संधी आहे. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल, तो उत्तरार्धात यशस्वी होईलच असे नाही. सातत्य राखणे हे गरजेचे आहे. डेव्हिड वॉर्नर व स्टीव्हन स्मिथ परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही. इंग्लंडला घरच्या प्रेक्षकांचा फायदा आहे. त्यामुळे सर्वोत्तम संघच बाजी मारेल, हे नक्की. भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचे झाले तर विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे चार खेळाडू महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कामगिरीवर सर्व मदार आहे. यातही बुमराह हा भारतासाठी X फॅक्टर असेल."
चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलच योग्य
चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला खेळवायचे यावर बरीच चर्चा झाली आणि प्रयोगही करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत भारताने या क्रमांकासाठी अनेक पर्याय वापरून पाहिले गेले. पण आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवावे असा सल्ला गंभीरने दिला आहे. तो म्हणाला,"चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघाकडे दोन क्वालिटी प्लेअर आहेत. दिनेश कार्तिक आणि राहुल... अंबाती रायुडूला बरीच संधी मिळाली, परंतु वर्ल्ड कप संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही. चौथा क्रमांक हा खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीच्या लहरीपणा पाहता सलामीवीर लवकर बाद झाल्यास सर्व भार चौथ्या क्रमांकावर येतो. लोकेश राहुल हा चौथ्या क्रमांकासाठी परफेक्ट आहे. चिकाटी आणि तंत्रशुद्ध फलंदाजी हा त्याचा प्लस पॉईंट आहे. दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकासाठी परफेक्ट."
Web Title: ICC World Cup 2019: Jasprit Bumrah will be a X factor for india in upcoming world cup, say Gautam Gambhir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.