मुंबई : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेची जोरात तयारी केली आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर भारतीय खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत. यंदाचा वर्ल्ड कप हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघच उंचावेल, असा दावा केला जात आहे. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने मात्र वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचा दावेदार सांगणे अवघड असल्याचे सांगितले. पण, या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे चार हुकुमी खेळाडू कोण असतील आणि त्यातील X फॅक्टर कोण ठरेल याचे भाकित केले आहे.
चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलच योग्यचौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला खेळवायचे यावर बरीच चर्चा झाली आणि प्रयोगही करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत भारताने या क्रमांकासाठी अनेक पर्याय वापरून पाहिले गेले. पण आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवावे असा सल्ला गंभीरने दिला आहे. तो म्हणाला,"चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघाकडे दोन क्वालिटी प्लेअर आहेत. दिनेश कार्तिक आणि राहुल... अंबाती रायुडूला बरीच संधी मिळाली, परंतु वर्ल्ड कप संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही. चौथा क्रमांक हा खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीच्या लहरीपणा पाहता सलामीवीर लवकर बाद झाल्यास सर्व भार चौथ्या क्रमांकावर येतो. लोकेश राहुल हा चौथ्या क्रमांकासाठी परफेक्ट आहे. चिकाटी आणि तंत्रशुद्ध फलंदाजी हा त्याचा प्लस पॉईंट आहे. दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकासाठी परफेक्ट."