लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. या सामन्यानं सर्वांची उत्कंठा ताणून धरली होती. कोण जिंकेल हे अखेरपर्यंत छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नव्हते. त्यामुळेच या सामन्यात दोन्ही संघ अपराजितच राहिले, परंतु अधिक चौकारांमुळे यजमान इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. पण, मैदानावरील हा थरार पाहताना संघातील एका खेळाडूच्या प्रशिक्षकानं प्राण सोडला. सुपर ओव्हरदरम्यान न्यूझीलंडच्या जिमी निशॅमच्या लहानपणीच्या प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
ऑकलंड येथील ग्रामर शिक्षक आणि प्रशिक्षक डेव्हिड जेम्स गॉर्डन असे त्यांचे नाव आहे. गॉर्डन यांची कन्या लिओनी हीने ही माहिती दिली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लडनेही बेन स्टोक्सच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर 241 धावा करून सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये किवींसमोर विजयासाठी 16 धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचा पाठलाग करताना निशॅमने दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला आणि त्याच क्षणी गॉर्डन यांनी प्राण सोडला. ''सुपर ओव्हरमध्ये सामना गेल्यानंतर जेम्स गॉर्डन यांच्या श्वासोश्वासाचा वेग वाढला. निशॅमने तो षटकार मारला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला,'' असे लिओनीनं सांगितले.
निशॅमनेही ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बेकरीत काम करा, पण खेळ खेळू नका; पराभवामुळे दु:खी खेळाडूचा भावूक संदेशशेवटपर्यंत निकाराची झुंज देऊनही विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंना कमालीचे दु:ख झाले आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशॅमने समर्थकांची माफी मागतानाच नव्या पिढीला एक भावूक संदेश दिला आहे. ''मुलांनो खेळांमध्ये करिअर करून नका, जमल्या बेकरीत काम करा किंवा अन्य काही करा आणि 60 वर्षे जगून सुखाने या जगाचा निरोप घ्या.'' असे ट्विट निशमने केले आहे.