ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या खेळपट्ट्या म्हटल्या की इथे वेगाचे राज्य दिसायलाच हवं. वेस्ट इंडिजचा तोफखाना वेगवान माऱ्यानं तगड्या प्रतिस्पर्धींना हैराण करत आहे. ओशाने थॉमस, जेसन होल्डर, कार्लोस ब्रॅथवेट, आंद्रे रसेल हे विंडीजचे गोलंदाज सध्या वर्ल्ड कप गाजवत आहेत. वेगाची चर्चा सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे नाव न घेणं चुकीचं ठरेल. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या स्टार्कने विंडीजविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. पण, या सर्वांना मात करून आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा मान एका वेगळ्याच खेळाडूनं मिळवला आहे.
इंग्लंड संघाकडून पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरने आतापर्यंतचा सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रम नोंदवला. त्याने 153च्या वेगानं हा चेंडू टाकला. 387 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेशला चौथ्याच षटकात धक्का बसला. बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. सौम्याची ही विकेट मात्र थोडी विचित्र ठरली. आर्चरने टाकलेला चेंडू यष्टिंचा वेध घेत सीमारेषेपार गेला( म्हणजे थेट षटकारच)... क्रिकेटमध्ये अशी विचित्र घटना प्रथमच घडली असावी. हाच तो जोफ्राचा वेगवान चेंडू...
जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले. इंग्लंडने शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153 धावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
पाहा व्हिडीओ...