लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची महती जगभरात आहे. यष्टिमागील चपळता, कल्पक नेतृत्व आणि फिनिशर म्हणून असलेली त्याची ओळख त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. यंदाचा वर्ल्ड कप हा धोनीचा अखेरचा वर्ल्ड कप असल्याची चर्चा आहे. धोनीचं वय पाहता वर्ल्ड कपनंतर कदाचीत तो वन डे क्रिकेटमधून निवृत्तीही घेऊ शकतो. अशाच भारतीय संघात त्याची जागा भरून काढण्यासाठी पर्याय म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. पण, त्याच्यात धोनीसारखे गुण नाहीत. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी धोनीसारखे गुण असलेला खेळाडू शोधला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील लढतीत यजमान इंग्लंडचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर हा जगाला मिळालेला नवीन महेंद्रसिंग धोनी असल्याचे मत, लँगर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,''बटलर हा दर्जेदार फलंदाज आहे. त्याची फलंदाजी पाहताना आनंद मिळतो. तो जगाला मिळालेला दुसरा धोनी आहे. पण, आशा करतो की आमच्याविरुद्ध तो शून्यावर माघारी परतावा. समरसेट क्लबकडून खेळताना त्याला मी पाहिले आहे आणि तो एक उत्तम फिनिशर आहे.''
इंग्लंडच्या संघाला मागील सामन्यात श्रीलंकेकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. पण, या पराभवातून ते दमदार पुनरागमन करतील असा विश्वास लँगरला आहे.
अखेरच्या षटकात धोनीनं दिला कोणता सल्ला; ऐका शमीकडून जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला शनिवारी अफगाणिस्तान संघाने जमिनीवर आणले. जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फौज असणाऱ्या भारतीय संघाला 224 धावाच करता आल्या. महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीवर प्रचंड टीका झाली. अफगाणिस्तानने कडवी झुंज देत सामन्यात चुरस निर्माण केली होती. मोहम्मद नबीच्या विकेटने सामना भारताच्या बाजूनं झुकवला. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाचे श्रेय जसं शमीला जातं तसं धोनीही त्याचा भागीदार आहे.
नबीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारल्यानंतर शमीकडे धाव घेत धोनीनं एक सल्ला दिला आणि त्यानंतर शमीनं इतिहास घडवला. चेतन शर्मा ( 1987) यांच्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. शमीनं या सामन्यात 40 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. धोनीनं असं काय सांगितलं, याबाबत शमीनंच खुलासा केला. तो म्हणाला,'' अखेरच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. त्यामुळे यॉर्कर टाकण्याचाच प्लान होता आणि धोनीनंही मला तोच सल्ला दिला. तो म्हणाला, रणनीतीत काही बदल करू नकोस तुला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. ही दुर्मिळ संधी असते आणि तुला ती मिळाली आहे. त्यामुळे त्याने जे सांगितले तेच मी केले.''