साउदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागेल, परंतु 5 जूनला होणाऱ्या या सामन्यापूर्वी मैदानाबाहेर शाब्दीक द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यातील पराभव बाजूला सारून आफ्रिकेचा संघ रविवारी बांगलादेशचा सामना करणार आहे. पण, आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारतीय संघाच्या कर्णधाराला टार्गेट करण्यास प्राधान्य दिले आहे. आफ्रिकेचा 24 वर्षीय गोलंदाज कागिसो रबाडाने कोहलीची मैदानावरील वागणुक ही अपरिपक्व असल्याचा दावा केला आहे.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात कोहली-रबाडा द्वंद्व पाहायला मिळाले आहे. कोहलीचा आक्रमक पवित्रा सर्वांना माहित आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करण्याची त्याची वृत्ती आहे, शिवाय शाब्दीक शेरेबाजी करणेही त्याला आवडते. पण, कोहलीची ही वागणुक रबाडाला आवडत नाही. भारतीय कर्णधाराला प्रतिस्पर्धी गोलंदाजांना डिवचायला आवडते, परंतु त्याला प्रत्युत्तर मिळाल्यास कोहलीला राग अनावर होतो. त्याची ही वागणुक अपरिपक्व असल्याचे रबाडा म्हणाला.
''कोहलीला ओळखणे अवघड आहे. मी केवळ रणनीतीचा विचार करत होतो, परंतु त्यावेळी कोहलीनं माझ्या गोलंदाजीवर चौकार मारला आणि अपशब्दही उच्चारले. त्याला मी प्रत्युत्तर केल्यावर तो संतापला. तो असा वागतो कारण त्यातून त्याला ऊर्जा मिळते, परंतु त्यावर प्रत्युत्तर मिळाल्यास त्याचे अपरिपक्व वागणे समोर येते. तो सर्वोत्तम खेळाडू आहे, परंतु तो प्रत्युत्तर सहन करू शकत नाही,''असे रबाडा म्हणाला.