Join us  

ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी

ICC World Cup 2019: शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 12:00 PM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं शतकी खेळी करून फॉर्म परत मिळवला होता, परंतु त्याच सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत तीन आठवडे मैदानावर उतरता येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धवनची दुखापत गंभीर असून त्याला पर्यायी खेळाडूची चाचपणी सुरू झाली आहे. या चाचपणीत रिषभ पंत हे नाव सध्या आघाडीवर आहे आणि माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांनी पंतच्याच नावाला पाठिंबा दिला आहे. पण, भारताच्या 1983च्या वर्ल्ड कप विजयी संघाचे कर्णधार कपिल देव यांनी मात्र धवनला पर्याय म्हणून वेगळ्याच खेळाडूचं नाव सुचवलं आहे.

कपिल देव यांनी मुंबईकर अजिंक्य रहाणेचे नाव सुचवले आहे. ते म्हणाले,''धवनला बदली खेळाडू म्हणून जर रहाणेचं नाव शर्यतीत असेल, तर त्याला प्राधान्या द्यायला हवं. रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांच्याऐवजी रहाणेची निवड कधीही योग्य ठरेल. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तो सलामीलाही येऊ शतको आणि मधल्या फळीतही खेळू शकतो.'' रहाणे सध्या इंग्लंडमध्येच आहे. तो कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यानं पदार्पणातच शतक झळकावले. भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधाराने 16 महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला होता. 

ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे. दुखापतग्रस्त धवनला भारतामध्ये पाठवण्यात येणार नाही. 

धवन हा संघाबरोबर इंग्लंडमध्येच राहणार आहे. त्याचबरोबर धवनचा पर्यायी खेळाडू तुर्तास तरी निवडण्यात येणार नाही. बीसीसीआयने एक ट्विट केले असून याबाबतची माहिती त्यांनी दिली होती. मात्र, टाईम्प ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार धवनची दुखापत गंभीर असून वर्ल्ड कप स्पर्धेतून तो माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला इंग्लंडसाठी रवाना होण्यास सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

अजिंक्य रहाणेला सूर गवसला, इंग्लंडमध्ये खणखणीत शतक ठोकलं

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019कपिल देवशिखर धवनअजिंक्य रहाणेरिषभ पंतसुनील गावसकरगौतम गंभीर