साउदॅम्पटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी केदार जाधवच्या सहभागावर बरीच चर्चा रंगली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे जाधव वर्ल्ड कप स्पर्धेतूनही माघार घेईल, असे चित्र होते. पण, जाधवने कसून मेहनत घेतली आणि स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करून संघासोबत इंग्लंड गाठले. संघाच्या सराव सत्रातही त्याने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत. 5 जूनला हा सामना होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जाधवच्या खांद्याला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेतूनही माघार घेतली आणि त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पण, त्याने तंदुरुस्ती परीक्षा पास केली. तरीही त्याला दोन्ही सराव सामन्यांत बाकावर बसवून ठेवले. त्यात पहिल्या सामन्यातील त्याच्या खेळण्याबाबत संघ व्यवस्थापनाकडून कोणतीही भूमिका जाहीर झालेली नाही. संघाच्या सराव सत्रात जाधवने कसून सराव केला आणि त्यात त्याने जोरदार फटकेबाजी केली.
विराट कोहलीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेटभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सराव सत्रात झालेल्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे आणि याच सरावादरम्यान कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण, त्याची ही दुखापत गंभीर नसून तो पहिल्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
अंगठ्याबर थंड पाण्याची पिशवी ठेवून कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतला. भारतीय संघाची जबाबदारी पूर्णत: कोहलीच्या खांद्यावर आहे आणि त्याची दुखापत गंभीर असल्यास भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, घाबराचये कारण नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. भारतीय संघ रविवारी सरावापासून विश्रांती घेणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले.