मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड व वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. सर्वांचा अंदाज चुकवत विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांनी 15 जणांच्या सदस्यांमध्ये स्थान पटकावले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या या संघात हार्दिक पांड्याचे स्थान पक्के होतेच, परंतु तो आणि राहुल वर्ल्ड कपमध्ये खेळतील याची शाश्वती देणे कठीण आहे. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे लोकपाल या प्रकरणी दोघांची चौकशी करत आहेत आणि निकाल विरोधात गेल्यास दोघांना स्पर्धेला मुकावे लागू शकते.कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्यानंतर पांड्या आणि राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. या प्रकरणाची चौकशी बीसीसीआयने नियुक्त केलेले लोकपाल करत आहेत आणि लोकपाल डी के जैन यांच्यासमोर या दोघांनी आपली बाजू मांडली. पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकल्यानंतर लोकपालांना या प्रकरणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकिय समितीसमोर मांडायचा आहे.
''अहवाल सादर करण्यासाठी वेळेचे बंधन नाही, परंतु वर्ल्ड कप संघ जाहीर होण्यापूर्वी तो सादर झाल्यास बरे होईल. या दोघांना केलेल्या गुन्ह्यापेक्षा अधिक शिक्षा मिळणार नाही. लोकपाल काय अहवाल देतात, त्यावर सर्व अवलंबून आहे,'' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते. पण, वर्ल्ड कप संघ जाहीर झाला तरी या प्रकरणाचा निकाल आलेला नाही. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत ही 23 एप्रिल ही आहे. त्यामुळे जर लोकपालांनी दोषी ठरवल्यास पांड्या व राहुल यांना वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागू शकते. याची जाण ठेवूनच निवड समितीने विजय शंकर व दिनेश कार्तिक हा पर्याय निवडला आहे.