मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणारा भारतीय संघ हा सर्वोत्तम असल्याचे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. त्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्यी दीड वर्षांत परदेशातही धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण, भारतीय संघात एक स्थान असे आहे, ज्यावर कोणाची दावेदारी असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. चौथ्या क्रमांकासाठी भारताने गेल्या दोन वर्षांत अनेक पर्यायांची चाचपणी केली, परंतु त्यांना सक्षम उमेदवार सापडलेला नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने या क्रमाकांसाठी एक सक्षम पर्याय सुचवला आहे.
वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहली, दिनेश कार्तिक, विजय शंकर, केदार जाधव आणि लोकेश राहुल यांच्या नावाची चर्चा आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गरज पडल्यास कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, असे संकेत दिले होते. पण, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पण, गंभीरने या क्रमांकासाठी राहुलला खेळवण्याचा सल्ला दिला आहे.
तो म्हणाला,"चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघाकडे दोन क्वालिटी प्लेअर आहेत. दिनेश कार्तिक आणि राहुल... अंबाती रायुडूला बरीच संधी मिळाली, परंतु वर्ल्ड कप संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही. चौथा क्रमांक हा खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीच्या लहरीपणा पाहता सलामीवीर लवकर बाद झाल्यास सर्व भार चौथ्या क्रमांकावर येतो. लोकेश राहुल हा चौथ्या क्रमांकासाठी परफेक्ट आहे. चिकाटी आणि तंत्रशुद्ध फलंदाजी हा त्याचा प्लस पॉईंट आहे. दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकासाठी परफेक्ट."
विराट कोहलीला सल्ला...भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गरज पडल्यास विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. त्यावर गंभीरने नाराजी प्रकट केली. कोहलीने तिसऱ्या क्रमंकावर खेळावे. फलंदाजीचा क्रम बदलून खेळावर परिणाम करून घेऊ नये. चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे, असा सल्ला त्याने दिला.
ICC World Cup 2019 : भारताचा 'हा' खेळाडू ठरणार X फॅक्टर; गंभीरने संगितले चार हुकुमी एक्के
गौतम गंभीरनं केलं पुन्हा कॅप्टन कोहलीला टार्गेट; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधार
ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, विजय शंकर 'ती' उणीव भरू शकत नाही; गंभीरनं व्यक्त केली चिंता