लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील सातवा सामना आज खेळवला जात आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन आशियाई संघांनी अनपेक्षित निकालाची नोंद करताना अनुक्रमे दक्षिण आफ्रिका व यजमान इंग्लंडचा पराभव केला. सहापैकी तीन सामन्यांत पाचवेळा संघांनी तीनशे धावांचा पल्ला पार केला, पण केवळ दोनच वैयक्तिक शतकाच नोंद झाली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या शतकाचा मान इंग्लंडच्याजो रूटने पटकावला, पण पाकिस्तानने त्यांच्या विजयावर विरजण घातले. पाकिस्तानने धक्कादायक निकाल नोंदवताना इंग्लंडवर 14 धावांनी विजय मिळवला. पराभव झाला असला तरी रूटचे हे शतक इंग्लंडसाठी लकी ठरू शकते.... त्यामागे एक लॉजिक आहे... चला तर जाणून घेऊया...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्स शतकासमीप पोहोचला होता, पण त्याला 89 धावांवर माघारी परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला ही संधी चालून आली होती, परंतु अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत त्याला 89 धावांवर नाबाद रहावे लागले. त्यामुळे वर्ल्ड कपमधील पहिले शतक कोण झळकावणार, याची सर्वांना उत्सुकता होती. इंग्लंडच्या जो रूटने हा मान पटकावला. त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत 104 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचून 107 धावांची खेळी केली आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील तो पहिला शतकवीर ठरला. त्यापाठोपाठ जोस बटलरनेही 76 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं 103 धावा केल्या. एका डावात दोन शतकवीर असूनही इंग्लंडच्या पदरी अपयश आले. वर्ल्ड कप स्पर्धेत असे प्रथमच घडले. इंग्लंडच्या बाबतीत ही चौथी वेळ ठरली.
असं संगळ असूनही इंग्लंडसाठी एक आनंदवार्ता आहे. वर्ल्ड कपमधील पहिल्या शतकवीराचा मान रूटनं पटकावणं हे इंग्लंडचे जेतेपद पटकावण्याचे संकेत आहेत. 2007, 2011 आणि 2015 या तीनही वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूने पहिले शतक झळकावले त्याच्या संघाने वर्ल्ड कप उंचावल्याचा इतिहास आहे. 2007पासून चालत आलेला हा योगायोग यंदाही जुळून आल्यास इंग्लंडचे जेतेपद निश्चित मानले जात आहे. पण, 2007, 2011 आणि 2015 मध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या संघाने त्या सामन्यात विजय मिळवला होता. यावेळी मात्र विजयाचा हा योगायोग न जुळल्याने इंग्लंडच्या गोटात थोडीशी धाकधुक आहे.
कोण आहेत मागील तीन वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले शतकवीर
ऑस्ट्रेलिया 2007 - रिकी पाँटिंग 113 ( 93 चेंडू), 9 चौकार व 5 षटकार वि. स्कॉटलंड
भारत 2011 - वीरेंद्र सेहवाग 175 ( 140 चेंडू), 14 चौकार व 5 षटकार वि. बांगलादेश
ऑस्ट्रेलिया 2015 - अॅरोन फिंच 135 ( 128 चेंडू), 12 चौकार व 3 षटकार वि. इंग्लंड