Join us  

ICC World Cup 2019 : विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तूरा!

ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या महासंग्रामाला अर्थात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याने सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 9:30 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेटच्या महासंग्रामाला अर्थात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याने सुरुवात होणार आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ वर्ल्ड कपमधील पहिला सामना 5 जूनला आफ्रिकेविरुद्धच खेळणार आहे. पण, या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे. मादाम तुसाँ संग्रहालयातर्फे कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.   

मादाम तुसाँ संग्रहालयाचे सरचिटणीस स्टीव्ह डेव्हीस यांनी सांगितले की,''पुढील दीड महिना क्रिकेटचा ज्वर चांगलाच वाढलेला दिसणार आहे आणि विराटच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी या क्रिकेटमय वातावरणा व्यतिरिक्त दुसरी वेळ असूच शकत नाही. क्रिकेट चाहते त्यांच्या फेव्हरेट खेळाडूचा खेळ पाहण्याचा आनंद लुटतीलच सोबत लंडन येथील मादान तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात आलेला विराटचा पुतळा पाहण्यासाठी गर्दी करतील, असा आम्हाला विश्वास आहे.''

या पुतळ्यासाठी कोहलीनं त्याची अधिकृत जर्सी, बूट आणि ग्लोज दान केले आहेत. उसेन बोल्ट, सर मो फराह आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पंक्तित कोहलीचा पुतळा पाहायला मिळणार आहे.  मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाने दोन सराव सामने खेळले. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पण, दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 95 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लोकेश राहुल व महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी खेळी साकारली.   

टॅग्स :वर्ल्ड कप 2019विराट कोहलीमॅडम तुसाद संग्रहालय