लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात भारताची विजयी मालिका खंडित झाली. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तसे करावे लागले. त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता आहे. सलामीवीर शिखर धवननंतर भारताला हा दुसरा मोठा धक्का आहे.
मयांक अग्रवाल कोण?
कर्नाटकच्या या फलंदाजाने गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दोन कसोटीत 2 अर्धशतकांसह 195 धावा केल्या आहेत. पण, त्याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्याचे नाणे खणखणीत वाजले आहे.
मागील 24 महिन्यांतील कामगिरी
मयांकने लिस्ट A क्रिकेमध्ये मागील 24 महिन्यांत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने 31 डावांत 58.23 च्या सरासरीनं आणि 105.75 च्या स्ट्राईक रेटनं 1747 धाव चोपल्या आहेत. त्यात 7 शतकं व 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंडमधील कामगिरी
मयांकने भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना 6 डावांत 88.40च्या सरासरीनं आणि 113.62 स्ट्राईक रेटने 442 धावा चोपल्या आहेत. त्यात तीन शतकांचा समावेश आहे.
सलामीला पर्याय ?
मयांकच्या समावेशाने भारतीय संघाला सलामीचा पर्याय मिळणार आहे. तो रोहित शर्मासह सलामीला येऊ शकतो आणि लोकेश राहुल पुन्हा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. पण, पुढील दोन सामन्यांत रिषभ पंत अपयशी ठरला, तर ही शक्यता आहे.
अंबाती रायुडूकडे दुर्लक्ष
वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ निवडताना चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा होती. पण, त्याच्या जागी विजय शंकरची वर्णी लागली. विजयला या संधीचं सोनं करता आलं नाही आणि आता तर दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. आता तरी रायुडूला संधी मिळेल, असे वाटले होते. पण, पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि मयांक अग्रवालची वर्णी लागली.
Web Title: ICC World Cup 2019: Mayank Agarwal to be Vijay Shankar likely replacement, know all about him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.