मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आला. जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडनं 18 धावांनी पराभूत केले. भारताच्या या पराभवानं अनेकांना धक्का दिला. पण, भारताच्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने कर्णधार कोहलीची खिल्ली उडवली.
स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कर्णधार कोहलीला राजाच्या वेशात दाखवणारा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. वॉनने याच फोटोवरून कोहली व टीम इंडियाची खिल्ली उडवली. त्यानं कोहलीच्या त्याच फोटोवर तिकीटाचा फोटो पेस्ट केला आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. या फोटो खाली त्यानं तिकीट प्लीज असेही लिहीले आणि त्यानं असं करून भारतीय संघाला टोमणा मारला.
इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचे 224 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 32.1 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 1992नंतर इंग्लंड प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. पण, या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉयनं पंचांशी हुज्जत घालून स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे. रॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) शिक्षा सुनावली आहे.
जेसन रॉयला शिक्षा कशासाठी?20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीनं बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला होता, त्यावर रॉयनं फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑसी खेळाडूंनी अपील केलं. बऱ्याच वेळ अपील केल्यानंतर पंच कुमार धर्मसेनानं त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयनं तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. या प्रकरणी आयसीसीनं रॉयला शिक्षा सुनावली आहे. रॉयला त्याच्या सामन्यातील मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. शिवाय त्याला दोन डिमेरिट्स गुणही मिळाले आहेत. पण, तो अंतिम फेरीत खेळणार आहे.