ICC World Cup 2019 : धोनी महान खेळाडू - विराट कोहली

मधल्या षटकात वेगवान धावा काढण्यात अपयश आल्यामुळे महेंद्रसिंग धोनी याच्यावर टीकाकारांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी मात्र हा मुद्दा नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 04:14 AM2019-06-29T04:14:08+5:302019-06-29T04:14:50+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 MS Dhoni is great player - Virat Kohli | ICC World Cup 2019 : धोनी महान खेळाडू - विराट कोहली

ICC World Cup 2019 : धोनी महान खेळाडू - विराट कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर - मधल्या षटकात वेगवान धावा काढण्यात अपयश आल्यामुळे महेंद्रसिंग धोनी याच्यावर टीकाकारांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी मात्र हा मुद्दा नाही. विराटने धोनीचा बचाव करीत अनुभव आणि सल्ला मौल्यवान असल्यामुळे त्याला महान खेळाडू संबोधले आहे. ‘धोनी एक महान खेळाडू असून, त्याला खेळाची उत्तम जाण आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होत आहे,’ असे विराट म्हणाला.

अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांविरोधात केलेल्या संथ खेळीमुळे धोनीवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर गुरुवारी झालेल्या वेस्ट इंडिज संघाविरोधातही धोनी अत्यंत धिम्या गतीने धावा करीत होता. अखेरच्या षटकात १६ धावा ठोकून धोनीने ६१ चेंडूत ५६ धावांचे योगदान दिले. ‘मधल्या फळीत खेळताना नेमके काय करायचे, याची धोनीला योग्य माहिती आहे. एखाद्या दिवशी जेव्हा तो खेळत नाही तेव्हा प्रत्येकजण टीका करतो, आमची मात्र नेहमी त्याला साथ असते. त्याने आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत,’ असे विराटने विंडीजविरुद्ध १२५ धावांनी विजय नोंदविल्यानंतर मीडियाशी बोलताना स्पष्ट केले.


धोनीसारखा खेळाडू सोबत असण्याची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला १५ ते २० धावांची गरज असते तेव्हा त्या कशा मिळवायच्या हे त्याला अगदी योग्य माहिती आहे. त्याचा अनुभव १० पैकी ८ वेळा यश मिळवून देतो,’ असे विराटने सांगितले.

भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असल्याच्या मुद्यावर बोलताना विराट म्हणाला, ‘मी तक्रार करू शकत नाही. आम्ही नुकतेच पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून चांगला खेळ करीत असून पुढेही करणे गरजेचे आहे. फलंदाजीच्या बाबतीत गेल्या दोन सामन्यात आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही, पण तरीही विजय मिळवला ही सुखावणारी गोष्ट आहे.’
त्याचप्रमाणे, ‘मी नेहमी माझ्या पद्धतीने खेळतो. एक आणि दोन धावा घेण्यात मला आनंद वाटतो. यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये खूप फरक पडतो. विजयात दिलेल्या योगदानाबद्दल मी आनंदी असून भविष्यातही देण्याचा प्रयत्न करत राहीन’, असेही विराट यावेळी म्हणाला.   

विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे देखील कौतुक केले. तो म्हणाला,‘ हार्दिक खूप चांगला खेळला आणि धोनीने योग्य शेवट केला. जेव्हा हे दोघे खेळतात तेव्हा संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत मिळते. मला फलंदाजांना काही सांगण्याची गरज नाही. ते आपल्या क्षमतेप्रमाणे योग्य खेळी करीत आहेत.’

Web Title: ICC World Cup 2019 MS Dhoni is great player - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.