लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल, असे काही जणांना वाटत होते. पण धोनीने निवृत्तीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पण एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार धोनी आगामी वर्ल्ड कपपर्यंत खेळत असल्याचे समोर आले आहे.
वर्ल्ड कपपूर्वी धोनी पाठिच्या दुखापतीने ग्रासला होता. आयपीएल खेळताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीने आता थोडे गंभीर रुप धारण केले आहे. डाव्या हाताचा अंगठा आता काळा पडला आहे. या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाशी हस्तांदोलन करताना धोनीने उजवा हात वापरला नव्हता.
या दुखापती आणि सातत्याने सोशल मीडियाव होणारी टीका, यामुळे धोनी निवृत्ती घेईल, असे वाटले होते. पण धोनी आता लवकर निवृत्त होणार नसल्याचे कळते. ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषक आता ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. या विश्वचषकात धोनी खेळणार असल्याची माहिती 'जागरण' या वेबसाईटने दिली आहे.
भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत माघारी परतला आणि किवींनी 18 धावांनी विजय साजरा केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीची विकेट ही वादाच्या कचाट्यात अडकली. धोनी धावबाद झाला तो नो बॉल असल्याची बरीच चर्चा रंगली... अखेरच्या पॉवर प्लेमध्ये केवळ पाच खेळाडू सर्कलबाहेर असल्याचा नियम असताना न्यूझीलंडचे सहा खेळाडू बाहेर होते. पण, पंचांना ते दिसले नाही. जर पंचांनी आपली कामगिरी चोख बजावली असती तर धोनी बाद झाला नसता आणि भारत जिंकला असता, अशीही मतं व्यक्त करण्यात आली. पण, नेमकं काय घडलं?
नक्की वाद काय?आयसीसीच्या नियमानुसार 41 ते 50 षटकांत घेण्यात येणाऱ्या तिसऱ्या पॉवरप्लेमध्ये केवळ पाच खेळाडू सर्कलबाहेर उभे करता येऊ शकतात. पण, ज्यावेळी धोनी बाद झाला तेव्हा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आणि त्यात सहा खेळाडू सर्कलबाहेर उभे असताना दिसत होते. थर्ड मॅन, डीप फाईन लेग, डीप पॉईंट, डीप स्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लाँग ऑन असे सहा खेळाडू बाहेर होते. त्यामुळे अंपायरच्या नजरचुकीमुळे धोनी बाद झाल्याचा आरोप होऊ लागला.
खरचं ती अपांयरची चूक होती का?सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो सत्य असला तरी प्रत्यक्ष मैदानावर ती परिस्थिती नव्हती. वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीनं चुकीचा फोटो दाखवला आणि त्यामुळे ही चर्चा रंगली. 49व्या षटकाचा पहिला चेंडू पडला तेव्हा न्यूझीलंडचे पाच खेळाडू ( थर्ड मॅन, डीप फाईन लेग, डीप पॉईंट, डीप स्वेअर लेग आणि लाँग ऑन) सर्कल बाहेर होते. तेव्हा धोनीनं षटकार खेचला. पुढच्या चेंडूवर मिड विकेटच्या खेळाडूला मागे पाठवण्यात आले आणि डीप फाईन लेगवरी खेळाडूला जवळ बोलावण्यात आले. त्या चेंडूवर धोनीला धाव घेता आली नाही. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी टीव्ही स्क्रीनवर एक ग्राफीक दाखवण्यात आलं त्यात सहा खेळाडू सर्कल बाहेर दिसत होते. पण, तेव्हा थर्ड मॅनच्या पोझिशनमध्ये बदल करण्यात आला होता.