मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यात भारतीय संघ अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ जाहीर झाल्यापासून किंवा तत्पूर्वी पासून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची चर्चा सुरू होती. अनेकांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला या क्रमांकावर खेळवावे असा प्रस्ताव मांडला, परंतु माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने धोनीनं कोणत्या क्रमांकावर खेळावे हा सल्ला दिला आहे.
तेंडुलकर म्हणाला,''भारतीय संघातील 1 ते 8 क्रमांकाच्या खेळाडूंनी फलंदाजीत हातभार लावायला हवा. प्रत्येक फलंदाजाला त्यांची भूमिका कर्णधार आणि प्रशिक्षकाने दिलेली आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी लक्षात घेत योगदान देण्याची गरज आहे. यातील पहिल्या चार क्रमांकाच्या फलंदाजांवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. तर 5 ते 8 क्रमांकाचे फलंदाज फिनिशरची भूमिका पार पाडतील.''
धोनीबाबत तेंडुलकर म्हणाला,''मला विचाराल तर धोनीनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. फलंदाजीची क्रमवारी कशी असेल याबाबत मला माहीत नाही. रोहित आणि शिखर धवन सलामीला येणार असतील, तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल हे माहीत नाही, परंतु धोनी पाचव्या क्रमांकावर येईल. त्यानंतर हार्दिक पांड्या असेल. धोनीसारखा अनुभवी फलंदाज अखेरपर्यंत संघाचा धावफलक हलता ठेवेल आणि तो खेळपट्टीवर असताना पांड्या आक्रमक खेळी खेळेल.''