लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे. धोनीला वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि त्यामुळेच त्याच्या निवृत्तीची मागणी होत आहे. पण, धोनीच्या मदतीला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आले आहेत. त्यांनी फिरकी गोलंदाजांचा सामना कसा करायचा याच्या टिप्स धोनीला दिल्या आहेत. शास्त्री हे स्वतः डावखुरे फिरकीपटू होते आणि त्यांच्या नावावर कसोटीत 151 व वन डेत 129 विकेट्स आहेत. त्यामुळे शास्त्रींच्या टिप्सचा फायदा धोनीला पुढील सामन्यांत नक्की होईल.
वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला यंदा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संथ खेळीमुळे त्याच्यावर टीका होत आहे. त्यामुळेच धोनीला आजच्या सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोनीला 7 सामन्यांत 223 धावा करता आल्या आहेत आणि त्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या ( 56*) एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी अशी अनेकांची मागणी आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्ती स्वीकारेल, असे सांगितले होते. पण, धोनी पुन्हा फॉर्मात येण्यासाठी प्रयत्नशील आहे. IANSच्या वृत्तानुसार शनिवारी धोनीनं नेट्समध्ये शास्त्रींकडून फिरकीवर कसे खेळायचे याबाबतचा सल्ला घेतला.
आयसीसीच्या 'त्या' व्हिडीओनं महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण भारतीय संघाच्या कामगिरीबरोबरच महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आला आहे. पण, कर्णधार विराट कोहलीनं या चर्चांना पूर्णविराम लावला होता, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.
निवृत्तीच्या चर्चांवर महेंद्रसिंग धोनीचं महत्त्वाचं विधान, काय आहे कॅप्टन कूलच्या मनात?धोनीनेच त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. ABP News चॅनेलला धोनीनं त्याच्या निवृत्तीबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला,''मी कधी निवृत्त होईन, याची मलाही कल्पना नाही. पण, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी निवृत्त व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे.'' त्याने या विधानातून संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. धोनीनं निवृत्त व्हावे अशीच त्यांची इच्छा असल्याचे, अप्रत्यक्षितरित्या धोनीला सुचवायचे आहे. त्यामुळे आता धोनी विरुद्ध व्यवस्थापक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकरकडून बचावभारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर माहीच्या मदतीला धावला आहे. , बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर तेंडुलकर म्हणाला,''मला वाटतं ती महत्त्वाची खेळी होती आणि संघाला जशा खेळीची गरज होती, धोनी तसाच खेळला. तो 50 षटकं खेळपट्टीवर टिकून राहिला, तर इतर फलंदाजांवरील दडपण कमी होतं. त्याच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि तो तेच करतोय. त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.''