लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर आता भारतीय संघामध्येकाही बदल होतील, असे म्हटले जात आहे. न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल, असे काही जणांना वाटले होते. पण आता भारतीय संघात धोनीचे स्थान आहे की नाही, ही गोष्ट येत्या शुक्रवारी साऱ्यांना समजू शकते.
यंदाच्या विश्वचषकात धोनीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे वाढत्या वयानुसार धोनीने निवृत्ती घ्यावी, असे काही जणांनी म्हटले होते. आता भारताचा संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांनी माघार घेतली आहे. पण या संघात धोनीचा समावेश होणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी संघ निवडण्यासाठी मुंबईमध्ये शुक्रवारी बैठक होणार आहे. निवड समितीची ही बैठक बीसीसीआयच्या मुख्यालयात होणार आहे. यावेळी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी संघ निवडवण्यात येणार आहे. या संघ निवडीमध्ये धोनीचे भवितव्य समजू शकणार आहे.