लंडन - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताने मिळवलेल्या दणदणीत विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीने यष्टीरक्षण करताना वापरलेल्या ग्लोव्हजचीच अधिक चर्चा झाली होती. धोनीने 'बलिदान बज' असा उल्लेख असलेले ग्लोव्हज वापरल्याने त्यावरून वादही झाला. अखेरीस पुढच्या सामन्यांमध्ये धोनीला हे ग्लोव्ज वापरता येणार नसल्याचे आयसीसीने सांगितले आहे. त्यानंतर नियमांचे उल्लंघन होणार असेल तर हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने स्पष्ट केले आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीतून केली होती. त्या लढतीत धोनीने यष्टीरक्षणासाठी वापरलेल्या ग्लोव्हजवर पॅरा स्पेशल फोर्सचे चिन्ह असलेल्या बलिदान बझ असा उल्लेख होता. दरम्यान, त्यावरून मोठा वाद होऊन धोनीने असे ग्लोव्हज वापरल्याने नियमभंग झाला असल्याचे आयसीसीने सांगितले. त्यानंतर बीसीसीआयसह अनेक आजी माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमींनी धोनीची बाजू घेत आयसीसीवर टीका केली. मात्र आयसीसीने ठाम भूमिका घेत अशा प्रकारचे ग्लोव्हज वापरता येणार नाही, असे स्पष्टपणे बजावले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पुढील लढतीत आपण हे ग्लोव्हज वापरणार नसल्याचे धोनीने सांगितले आहे. अशा प्रकारचे ग्लोव्हज वापरल्याने आयसीसीच्या नियमावलीतील नियमांचा भंग होत असेल तर विश्वचषकात हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने बीसीसीआयला सांगितले आहे, असे एका संकेतस्थळाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळाडूच्या किट संदर्भात एक नियमावली असते आणि त्याचे काटेकोरपणे पालन होते. कोणत्याहे खेळाडून आपल्या जर्सीवर वैयक्तिक संदेश देणारे किंवा राजकीय, जातीय संदेश देणारे चिन्ह न वापरण्याचा नियम आहे.
Web Title: ICC World Cup 2019: M.S. Dhoni's reaction on gloves after controversy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.