लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांगलादेश संघाने रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले. आफ्रिकेने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी बांगलादेशला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करून दिली. शकिब-मुशफीकर या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी करून विक्रमाला गवसणी घालती.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचे हे आव्हान स्वीकारत बांगलादेशने सकारात्मक सुरुवात केली. इक्बाल व सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. नवव्या षटकात फाहलेक्वायोने बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्याने क्विंटन डी'कॉककरवी इक्बालला ( 16) झेलबाद केले. त्यानंतर अवघ्या 15 धावांची भर घालून सरकारही माघारी परतला. ख्रिस मॉरिसने त्याला 42 धावांवर बाद केले.
त्यानंतर शकिब व मुशफिकर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. बांगलादेश संघाने दोन विकेट गमावून 200 धावा जेव्हा जेव्हा केल्या तेव्हा त्यांची जयपराजयाची आकडेवारी ही 19-5 अशी राहिली आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. इम्रान ताहीरने ही जोडी तोडली. त्याने शकिबला 75 धावांवर बाद केले.
Web Title: ICC World Cup 2019 : Mushfiqur Rahim and Shakib Al Hasan set a Highest partnerships for bangladesh in WC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.