लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडूनही हार पत्करावी लागली. या पराभवामुळे इंग्लंडच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. इंग्लंडला आता उर्वरित दोन्ही सामन्यांत भारत आणि न्यूझीलंड यांना पराभूत करावेच लागणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला.
अॅरोन फिंचचे खणखणीत शतक आणि त्याला डेव्हीड वॉर्नर ( 53), स्टीव्हन स्मिथ ( 38) व अॅलेक्स केरी ( 38) यांची साथ लाभली. एका वेळी ऑस्ट्रेलियाचा संघ 350 धावा सहज कुटतील असे वाटत होते, परंतु इंग्लंडने त्यांना 285 धावांवरच समाधान मानण्यास भाग पाडले. लॉर्ड्सच्या मैदानावर 275+ धावांचा पाठलाग करणे नेहमी अवघडच होते आणि कोणत्याही संघाला आतापर्यंत यश मिळाले नव्हते. त्यामुळे इंग्लंड येथे विजय मिळवून इतिहास घडवतील अशी भाबडी आशा होती.
पण, जेसन बेहरेनड्रॉफनं इंग्लंडच्या स्वप्नांना सुरूंग लावला. त्यानं 44 धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याल साथ मिळाली ती मिचेल स्टार्कची. त्यानंही 43 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्स इंग्लंडला विजय मिळवून देईल असे वाटत होते, परंतु स्टार्कच्या अप्रतिम यॉर्करने त्याचा त्रिफळा उडवला आणि लॉर्ड्सवर स्मशान शांतता पसरली. इंग्लंडच्या उरलेल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यांचा संपूर्ण संघ 221 धावांत तंबूत परतला.
इंग्लंडच्या या हाराकिरीनं माजी फलंदाज केव्हीन पीटरसनला तोंडघशी पाडलं. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले 285 धावांचे लक्ष्य इंग्लंड पाच विकेट राखून पार करेल, असा दावा पीटरसनने केला होता, परंतु झाले भलतेच आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवली गेली.