लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : सर्वच संघाचे मिशन वर्ल्डकप सुरु झाले आहे. पण वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या प्रशिक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण वर्ल्डकपनंतर त्यांची पीसीबी हकालपट्टी करणार असल्याचे म्हटले जात आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर आहेत. त्याचबरोबर निवड समिती अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक आहे. वर्ल्डकपनंतर या दोघांनाही आपली पदे सोडावी लागणार आहेत.
पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, " वर्ल्डकपनंतर प्रशिक्षक मिकी आर्थर आणि इंझमाम यांचा करार संपुष्टात येत आहे. पीसीबी हे दोन्ही करार वाढवणार नाही. त्यामुळे या दोघांनाही ही पदे सोडावी लागणार आहेत."
आर्थर यांच्यानंतर प्रशिक्षक कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचे उत्तरही पीसीबीने शोधले आहे. कारण आर्थर यांच्यानंतर त्यांना इंझमामला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवायचे आहे. दुसरीकडे इंझमामच्या निवड समिती अध्यक्ष पदावर ते पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आमीर सोहेलला आणण्याचा विचार करत आहेत. यापूर्वी 2000-04 या कालावधीमध्ये सोहेलने या पदावर काम केले आहे.