लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पहिल्या सामन्यात तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात मात्र तिनशे धावांचा पल्ला गाठला. हा पल्ला गाठताना पाकिस्तानने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या. पण या सामन्यात पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. एकाही खेळाडूने शतक न झळकावता पाकिस्तानने सर्वोच धावसंख्या रचण्याचा विक्रम विश्वचषकात प्रस्थापित केला आहे. कारण विश्वचषकात एकही शतक न झळकावता झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्ध एकही शतक न झळकावता ३४१ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनंतर हा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर होता आणि तो या विश्वचषकातच झाला होता. पाकिस्तानने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्धच एकही शतक न झळकावता ३३९ धावा केल्या होत्या.
एकही शतक न झळकावता विश्वचषकात झालेल्या सर्वाधिक धावा
348/8 पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०१९
341/6 दक्षिण आफ्रिका विरुद्ध युएई, वेलिंगटन, २०१५
339/6 पाकिस्तान विरुद्ध युएई, नेपिअर, २०१५
338/5 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, स्वेस्निया, १९८३
पाकिस्तान तिनशे पार, इंग्लंडपुढे 349 धावांचे आव्हान
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. या गोष्टीचा प्रत्यय पाकिस्तानने या विश्वचषकात आणून दिला. पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र पाकिस्तानने तिनशे धावांचा आकडा पार केल्याचे पाहायला मिळाले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक घडीला पाकिस्तानचा एक तरी स्थिरस्थावर झालेला फलंदाज खेळपट्टीवर असल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचे शतक झाले नसले तरी मात्र त्यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तरी त्यांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही. पण त्यानंतर बाबर आझम(63), मोहम्मद हाफिझ (84) आणि कर्णधार सर्फराझ अहमद (55) यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाची धावगती वाढवली.
Web Title: ICC World Cup 2019: New record set by Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.